पशुखाद्य गगनाला अन् दूध कवडीमोल; शेतकऱ्यावर व्यवसाय बंद करण्याची वेळ

पशुखाद्य गगनाला अन् दूध कवडीमोल; शेतकऱ्यावर व्यवसाय बंद करण्याची वेळ

अशोक वेदपाठक

मोरगाव : सामान्य नागरिक कोरोना संकटातून सावरतो ना सावरतो तोच महागाईने त्याचे आर्थिक कंबरडे मोडले. यात दूध उत्पादक शेतकरीही भरडला आहे. घसरलेले दुधाचे दर आणि पशुखाद्यांच्या किमतीत झालेली भरमसाट वाढ यामुळे पशुपालक शेतकरी पुरता घाईला आला असून, अनेकांवर हा व्यवसायच बंद करण्याची वेळ आली आहे. हिरवा चारा, गोळी पेंड, औषध खर्च प्रमाणापेक्षा जास्त आहे. जनावरे आजारी पडली तर सरकारी डॉक्टर वेळकाढूपणा करतात. नाईलाजाने खासगी डॉक्टरांकडे जावे लागते. यासाठी तपासणी फी जादा मोजावी लागते. यात उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत आहे.

बारामती तालुक्यात तरडोली (मोरगाव) येथील शेतकरी भगवान लवटे यांनी शेतीला जोड म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला होता. लाखो रुपये खर्च करून 40 गायींचा गोठा उभारला होता. संपूर्ण कुटुंब राबूनही उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने त्यांनी हा व्यवसाय अखेर बंद केला. शेतीतील खर्च अवाढव्य आणि उत्पादन कमी झाले होते. त्यातून सावरण्यासाठी पशुपालन, दुग्धव्यवसाय सुरू केला; मात्र तोही रामभरोसेच ठरला. पशुखाद्यांचे भाव गगनाला भिडले आणि दूध कवडीमोल दरात विकू लागले. परिणामी गोठा बंद करावा लागला, अशी खंत लवटे यांनी व्यक्त केली.

…तरीही उत्पन्न नाही

दूध उत्पादनासाठी 40 पशुंचे पालन केले. यासाठी कुटुंबातील 6 पुरुष, 2 मुले, 2 महिला, सुना यांनी अविरत कष्ट केले. सर्व सदस्य घरातीलच असल्याने मजुरीचा खर्च वाचला; मात्र त्यामानाने दुग्धउत्पादन होत नव्हते. त्याउलट खर्च अवाढव्य होत असल्याने नाईलाजास्तव पशुपालन व्यवसाय बंद केला असल्याचे भगवान लवटे कुटुंबीयांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news