

Ajit Pawar Sharad Pawar Meeting
बारामती: राज्यातील महापालिका निवडणूकात दोन्ही राष्ट्रवादीला मोठा धक्का बस बसल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची आता बारामतीतील शरद पवार यांचे निवासस्थान गोविंद बाग येथे बंद दाराआड बैठक सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित आहेत
आज शनिवारी (दि १७) बारामतीत पार पडत असलेल्या कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीतील प्रमुख नेतेमंडळी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या भेटीला गेली आहेत. त्यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरु आहे. चर्चेचा तपशील मात्र अद्याप मिळालेला नाही. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार आदींची उपस्थिती आहे.
शरद पवार यांच्याशी गोविंदबागेत त्यांची सकाळी चर्चा सुरु आहे. शरद पवार हे शुक्रवारपासूनच बारामतीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही रात्री ऊशीरा बारामतीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी राज्यभरातील २९ महापालिकांचे निवडणूक निकाल लागले. त्यात दोन्ही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालेले नाही. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पवार एकत्र लढले.
परंतु तरीही कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय चर्चा होते याकडे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा झडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे काही होणार नाही हे सांगितले असले तरी शनिवारच्या बैठकीचा नेमका उद्देश काय हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.