

पुणे: ससून रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे. मागील पाच महिन्यांत ही संख्या तब्बल 11 हजार 500 वरून दीड हजारांपर्यंत खाली आली आहे. ‘झीरो पेंडन्सी’च्या उद्दिष्टाने प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्याचा हा परिणाम मानला जात आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. काही महिन्यांपूर्वी प्रलंबित अर्जांचा आकडा 11 हजारांहून अधिक झाला होता. या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने विशेष मोहीम राबवत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर भर दिला. याअंतर्गत पूर्वी आठवड्यातून केवळ दोन दिवस होणारी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा आता आठवड्यातील पाच दिवस सुरू केली आहे.
सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत ओपीडी सुरू ठेवण्यात येत असून, त्यामुळे अर्जांची तपासणी आणि प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया वेगाने होऊ लागली आहे. तसेच, तज्ज्ञ डॉक्टर (स्पेशालिस्ट) उपलब्ध करून देण्यात आले असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. डेटा एंट्री ऑपरेटरची संख्या वाढवून अर्जांची नोंदणी व प्रक्रिया जलद करण्यावर भर देण्यात आला आहे.
6 महिन्यांपूर्वी प्रलंबित प्रकरणे : 11,500
सध्याची प्रलंबित प्रकरणे : 1,500
पूर्वी ओपीडी दिवस : आठवड्यातून 2 दिवस
सध्या ओपीडी दिवस : आठवड्यातून 5 दिवस
ओपीडी वेळ : सकाळी 9 ते सायंकाळी 5
सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे. प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सहा महिन्यांहून अधिक काळ प्रतिसाद न देणाऱ्या अर्जदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. अशा अर्जदारांना पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. यामुळे जुन्या आणि निष्क्रिय अर्जांचा बोजा कमी झाला.
डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय