

पुणे: आयएलएस लॉ कॉलेज तसेच कॉलेजमधील मुलांच्या वसतिगृहात राहणाऱ्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्रास देत रॅगिंग केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महाविद्यालयीन परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत 35 वर्षीय विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विद्यार्थी हा आयएलएस लॉ कॉलेजमध्ये एलएलबी द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून, तो लॉ कॉलेज रोडवरील मुलांच्या वसतिगृहात राहतो. त्याच वसतिगृहात राहणारे आणि द्वितीय वर्षात शिकणारे पाच विद्यार्थी यांनी त्याला शिवीगाळ तसेच मानसिक त्रास देत रॅगिंग केल्याची विद्यार्थ्याची तक्रार आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्याने काही महिन्यांपूर्वी डेक्कन पोलिसांकडे लेखी अर्ज दिला होता. या अर्जाची पोलिसांनी चौकशी केली.
प्राथमिक चौकशी केल्यानंतर या प्रकरणात अखेर महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थ्याने याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडेही अर्ज दिला होता. त्यावर महाविद्यालयाने नेमकी कोणती कारवाई केली? याची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाविद्यालयीन वसतिगृहात रॅगिंगच्या घटना पुन्हा समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.