

आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदी येथील पवित्र इंद्रायणी नदीप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून आल्याने नदीतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही प्रदूषण रोखण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने भाविक, वारकरी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बुधवारी (दि. १४) आळंदीतील सिद्धबेट बंधारा, गरुडस्तंभ आणि भक्त पुंडलिक मंदिर घाट परिसरात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आले. नदीच्या पाण्यावर तरंगणारे मृत मासे आणि परिसरातील दुर्गंधीमुळे नदीच्या सद्य:स्थितीचे गांभीर्य पुन्हा समोर आले आहे. यापूर्वीही सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला अशाच घटना घडल्या होत्या.
इंद्रायणी नदीत मिसळणारे मैलामिश्रित सांडपाणी आणि औद्योगिक क्षेत्रातून येणारे रसायनयुक्त सांडपाणी हे प्रदूषणाचे संभाव्य स्रोत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रदूषित पाण्यामुळे विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी घटल्यास माशांचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, सध्याच्या घटनेचे नेमके कारण अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
नदीत सोडले जाणारे सांडपाणी रोखणे, पाण्याचे नमुने तपासणे, प्रदूषणाचे स्रोत शोधणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ मृत मासे हटवून प्रश्न सुटणार नाही. इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने कृती आराखडा राबवावा, अशी मागणी भाविक आणि वारकऱ्यांकडून होत आहे.
इंद्रायणी नदीतील अस्सल माशांच्या स्थानिक प्रजाती नामशेष झाल्या असून, प्रदूषित रासायनिक पाण्यामुळे संक्रमित अशा विषारी माशांची निर्मिती नदीत होत आहे. जी येणाऱ्या काळात घातक ठरणार आहे. यामुळे कर्करोगासह पाण्यातील इतर जलचरांचे जीवन देखील धोक्यात येणार आहे. यावर लवकरच सविस्तर माहिती प्रसिद्ध करणार आहोत.
निसार सय्यद, अविरत फाउंडेशन, आळंदी