

पुणे : पुढारी वृत्तसेवा
कोरोनापूर्वीचे जीवन पुन्हा एकदा सुरळीत होत असताना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) महाविद्यालयांमध्ये सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझर बंधनकारक करा, अशा सूचना दिल्या आहेत. एआयसीटीईच्या या भूमिकेमुळे आता विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेऊ द्याल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र आणि देशातील इतरही राज्यांत सध्या कोरोनाचा उद्रेक झालेला नाही. बहुतांश राज्यांमध्ये मास्कची सक्तीही उठविण्यात आली आहे. पुढील काही दिवसांमध्ये कोरोनाची लाट येईल, अशीही शक्यता आरोग्य यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आलेली नाही.
असे असले तरीही एआयसीटीईने महाविद्यालयांना सर्व प्रकारची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी गर्दी करू नये, मास्क वापरणे बंधनकारक आहे, सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे; याशिवाय थर्मल स्कॅनिंग करणे, वारंवार हात धुणे, एकत्र घोळक्याने फिरू नये, अशाही सूचना एआयसीटीईकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाकाळात नियमांचा भडिमार झाल्याने आता विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि कर्मचारीही नियमांपासून सुटका होण्याची वाट पाहत आहेत. परंतु, त्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे चित्र दिसून येत आहे.