

कोल्हापूर ; अनिल देशमुख : कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले-इचलकरंजी हे मार्ग मंजूर होऊन पाच वर्षे उलटली तरी त्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. नव्या गाड्या सुरू करण्याऐवजी आहे त्यातीलच पाच गाड्या बंद केल्या. कोल्हापूर-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचा निर्णय होत नाही, यांसह अनेक प्रश्न असताना रेल्वेची भूमिका पाहता, रेल्वेने कोल्हापूरला साईड ट्रॅकवरच ठेवले की काय, असे चित्र गेल्या काही वर्षांत निर्माण झाले आहे. मात्र, रेल्वेच्या विकासाला गती देण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ते खासदार करतात तरी काय, असा सवाल आता सर्वसामान्यांतून व्यक्त होऊ लागला आहे.
कोल्हापूर-वैभववाडी आणि हातकणंगले-इचलकरंजी या दोन नव्या मार्गांना 2016 साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली. यानंतर या मार्गांचे सर्वेक्षण झाले. त्यानुसार या मार्गांचा डीपीआर तयार झाला. या मार्गांचा प्रस्ताव कॅबिनेटपुढे मंजुरीसाठी आहे. असे असताना कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याचा प्रस्तावच आपल्यापुढे आलेला नाही, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट सांगून टाकले. रेल्वे राज्यमंत्री जर असा प्रस्तावच आपल्यापुढे आला नाही, असे म्हणत असतील तर कोल्हापूरचे दोन खासदार दिल्ली दरबारी काय करत आहेत, अशी विचारण्याची वेळ आली आहे.
रेल्वे प्रश्नाबाबत विभागीय व्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक यांच्या स्तरावर दरवर्षी खासदारांच्या उपस्थितीत बैठका होत असतात. या प्रत्येक बैठकांना खासदार उपस्थित असतात का? तिथे पोटतिडकीने आणि तितक्याच आक्रमकपणे काही मांडतात का? रेल्वेमंत्र्यांना सर्व विषयांसाठी एक पत्र दिले म्हणजे झाले का? रेल्वे स्थानकाला भेट देऊन, प्रत्यक्ष पाहणी करून, नेमक्या समस्या, त्यावरील उपाय यांबाबत कधी चर्चा झाली का? संसदेत या प्रश्नांबाबत कधी विचारणा केली का? संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन काही निर्णय करून घेतले का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
रेल्वे स्थानकावर जितके मोठे प्रश्न आहेत, तितके छोटे प्रश्नही आहेत. मात्र, त्यांची सोडवणूकच होत नाही. रेल्वे फाटकावर पादचारी उड्डाण पुलासाठी पाच वर्षांपूर्वी निधी मिळाला आहे. त्याची निविदाही काढली आहे. मात्र, रेल्वे अजून डिझाईन अंतिम करून देत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. रेल्वेच्या प्लॅटफार्म विस्तारीकरणाचे कामही गेल्या पाच वर्षांपासून चालू आहे, त्याला गती मिळत नाही; पण त्याकडेही कोणाचे लक्ष नाही. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी विकासाची दूरद़ृष्टी ठेवून कोल्हापुरात रेल्वे आणली, त्या शाहूंचे स्मृती शताब्दी वर्ष सुरू आहे. कोल्हापूरच्या रेल्वेला 131 वर्षे पूर्ण झाली आहेत, तरीही रेल्वे विकासाकडे कोणी लक्ष देत नाही, यापेक्षा कोल्हापूरचे मोठे दुर्दैव काय असेल, असेही बोलले जात आहे.
कोल्हापूर-बंगळूर मार्गावरील राणी चन्नम्मा एक्स्प्रेस बंद करून मिरजेतून सुरू केली. ती पुन्हा कोल्हापुरात आणण्याची धमक एका तरी खासदारात आहे की नाही? कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस बंद केली. त्याबरोबर कोल्हापूर-सोलापूर, कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-बिदर या गाड्या बंद केल्या. खरोखरच या गाड्यांना प्रतिसाद नव्हता का? रेल्वेचे म्हणणे तसे असेल तर कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-सोलापूर या गाड्यांना असलेल्या प्रवाशांच्या गर्दीला काय म्हणायचे? गर्दी असेल आणि तिकीट विक्री नसेल तर ते रेल्वेच्या प्रशासकीय यंत्रणेचे अपयश आहे, त्यात कोल्हापूरचा बळी का देता, असा सवालही नागरिक करत आहेत.