

पुणे: मातृभाषेतील शब्दसंग््राह असो वा शुद्धलेखन, शब्दोच्चार असो वा लेखन, याविषयीची माहिती मिळविणे एआय तंत्रज्ञानाद्वारे सहजशक्य झाले असून, त्यासाठी विविध एआय ॲप आणि व्हॉइस टूल्सचा वापर केला जात आहे. त्यामुळे मातृभाषा शिकण्यासाठी आता तरुणाई कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करीत आहे. मराठी, बंगाली, हिंदी, तमीळसह आपली कोणतीही मातृभाषा असो, त्यातील शब्द, शब्द उच्चारण्यासाठी पद्धत, त्याचे लेखन, व्याकरण, अशी माहिती एका क्लिकवर मिळत आहे. विशेषतः आता मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपवर उपलब्ध असलेल्या एआयआधारित साधनांमुळे मातृभाषा शिकणे अधिक सोपे झाले आहे.
प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी अभिमान असतो आणि प्रत्येकालाच मातृभाषा सखोल पद्धतीने शिकावी, असे वाटते. त्यामुळे आताच्या मातृभाषा शिकण्याची उत्सुकताही तरुणाईत वाढताना दिसत आहे. आपल्या मातृभाषेशी आपण जोडले जावे, त्यात लेखन आणि त्यातील शब्दसंग््राह, व्याकरण, ती बोलण्याची पद्धत जाणून घेता यावी, यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही ज्ञान मिळविले जात आहेत.
त्यामुळेच खासकरुन मातृभाषेविषयी सखोल माहिती मिळवण्यासाठी एआयचा वापरही काही तरुण-तरुणींकडून होत आहे. चॅटजीपीटी असो वा एआयवर आधारित विविध ॲपच्या माध्यमातून उदा. मराठी असो वा बंगाली... सर्वच भाषांबद्दलची माहिती उपलब्ध होत आहे. अगदी आपण मराठीतील शब्द उच्चाराबद्दल माहिती पाठवा, असे सर्च केल्यास त्याचीही माहिती सहज उपलब्ध होत आहे. एखाद्या लेखात शुद्धलेखनाच्या चुका झाल्यास एआय लगेच दुरुस्ती सुचवते, त्यामुळेच एआयमुळे मातृभाषा शिकणे सोपे झाले आहे. आज शनिवारी (दि. 21 फेबुवारी) साजऱ्या होणाऱ्या जागतिक मातृभाषा दिनानिमित्त या ट्रेंडविषयी घेतलेला हा आढावा.
याविषयी राज लोखंडे म्हणाले, माझी मातृभाषा मराठी आहे. मी मराठीत लेखनही करतो. त्यामुळे लेखनातील नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी मी एआय तंत्रज्ञानाचा वापर करतो. एआयच्या वापरातून भाषेबद्दलची माहिती सहज उपलब्ध होते.
सोशल मीडियामुळे वाढलेले महत्त्व
आजची तरुणाई सोशल मीडियावर सक्रिय आहे. पोस्ट, ब्लॉग, व्हिडीओ किंवा रील्स तयार करताना एआय भाषांतर, लेखन आणि संपादनासाठी मदत करीत आहे. त्यामुळे मातृभाषेत दर्जेदार आणि आकर्षक कंटेंट तयार करणे अधिक सोपे झाले आहे. एआयमुळे भाषेतील कठीण शब्दांचे अर्थ, योग्य वाक्यरचना, व्याकरणातील बारकावे आणि अचूक उच्चार, याबाबत माहिती मिळते.