Manache Shlok Controversy | 'मनाचे श्लोक'वरून वाद, हायकोर्टाच्या ग्रीन सिग्नलनंतरही पुण्यात हिंदुत्ववाद्यांनी शो बंद पाडला
पुणे - मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक या चित्रपटाचे शो हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पाडले. ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. पण, पुण्यातील कोथरूड येथील चित्रपटगृहांमध्ये सुरू असलेला चित्रपट कार्यकर्त्यांनी बंद पाडला. यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. चित्रपटाचे मनाचे श्लोक हे नाव बदलण्याची मागणीही यावेळी संघटनांनी केली.
तसाच प्रकार धायरी येथील एका मॉलमध्ये घडला. पण तणाव निर्माण झाल्यामुळे प्रदर्शन थांबवावे लागले आहे. मराठी चित्रपट 'मनाचे श्लोक'चे दिग्दर्शन अभिनेत्री, निर्माती मृण्मयी देशपांडेने केले आहे. हायकोर्टाकडून चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी मिळाल्यानंतरही चित्रपटगृहामध्ये कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या नावावरून आक्षेप घेत निदर्शने केली. 'मनाचे श्लोक' हे नाव समर्थ रामदास स्वामींच्या आध्यात्मिक श्लोकांच्या संग्रहाशी संबंधित पवित्र ग्रंथ आहे आणि त्याचा व्यावसायिक चित्रपटासाठी वापर केल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, हा पवित्र ग्रथाचा अनादर आहे, असा आरोप करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार,हिंदू संघटनेशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्या उज्ज्वला गौड यांनी चित्रपटगृहात जाऊन आक्षेप नोंदवला. यावेळी चित्रपट बंद करण्यात आला. त्यांनी चित्रपट व्यवस्थापनाला देखील सुनावले.
चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच टायटलवरुन वाद निर्माण झाला होता. हिंदू जनजागृती समितीने चित्रपटाचा तीव्र निषेध व्यक्त करत श्रद्धेचे "बाजारीकरण" केल्याचा आरोप केला. हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते पराग गोखले म्हणाले, ''समर्थ रामदास स्वामी महाराज यांचे 'मनाचे श्लोक' पवित्र साहित्य आहे. चित्रपटासाठी हे नाव वापरणे केवळ श्रद्धेचा अपमानच नाही तर धार्मिक भावना देखील दुखावते. चित्रपटातून 'मनाचे श्लोक' हे नाव तत्काळ हटवावे आणि केंद्र-राज्य सरकारने भविष्यात अशा धार्मिक चिन्हांचा अविचारी वापर करण्यावर बंदी घालण्यासाठी कायदा करावा.''
काही कट्टरवर्गीय कार्यकर्त्यांनी कडक इशारे देऊन चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करावे अशी मागणी केली. ज्यामुळे चित्रपटगृह व्यवस्थापनना काही ठिकाणी चित्रपटाचे शो रद्द करावे लागले.
सेन्सॉरनी दिग्दर्शकाला मनाचे श्लोक चित्रपट वापरण्याची परवानगी कशी दिली? दिग्दर्शकांना कसले स्वातंत्र्य मिळाले? स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी काही करावे का? जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर आम्ही तो नष्ट करू. चित्रपटगृहातील स्क्रिनची तोडफोड करू, अशी धमकी वजा इशारा देखील त्यांनी दिला.
मृण्मयीने सोशल मीडियावर केली होती 'ही' पोस्ट
मृण्मयी देशपांडेने हायकोर्टाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. तिने पोस्टमध्ये म्हटले- ''माननीय उच्च न्यायालयाने 'मना' चे श्लोक या चित्रपटाच्या प्रदर्शन थांबवण्यासाठीच्या केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान, चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी स्थगिती आदेश देण्यास नकार दिला. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. आम्ही 'मना'चे श्लोक' चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो.

