

पुणे : गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये 65 अनोळखी मृतदेह (अनआयडेंटीफाइड डेड बॉडीज) सापडले आहेत. त्यांचे विविध दुर्घटना, अपघात, नैसर्गिक कारणांसह अन्य कारणांमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर तपासानंतर रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने लोहमार्ग पोलिसांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.(Latest Pune News)
जानेवारी ते सप्टेंबर 2025 या नऊ महिन्यांच्या कालावधीत रेल्वेच्या पुणे विभागात हे विविध घटनांमधील अनोळखी मृतदेह रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस यांना आढळले. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात एकूण 107 रेल्वेस्थानके आहेत. त्याअंतर्गत असलेले रेल्वे ट्रॅक, रेल्वेस्थानके, प्लॅटफॉर्म आणि रेल्वेस्थानक परिसर भागात हे अनोळखी मृतदेह सापडल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
रेल्वे प्रशासनाकडून अनोळखी मृतदेहांचा अंत्यसंस्कार खर्चासाठी एका मृतदेहास पाच हजार रूपये दिले जातात. गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधेत 65 अनोळखी मृतदेह रेल्वेच्या पुणे विभागात आढळले. त्यांच्या अंत्यसंस्काराकरिता सुमारे 3 लाख 25 हजार रूपयांपर्यंतचा खर्च आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वेच्या पुणे विभागात जानेवारी ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 65 अनोळखी मृतदेह आढळून आले. दुर्घटना, अपघात, नैसर्गिक कारणांसह अन्य कारणांमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यांच्या कुटुंबीयांचा तपास न लागल्याने रेल्वे प्रशासनाने लोहमार्ग पोलिसांच्या सहकार्याने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. याकरिता एका मृतदेहास 5 हजार रूपये अशी आर्थिक मदत रेल्वेकडून लोहमार्ग पोलिसांना नियमानुसार करण्यात आली.
हेमंत कुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे विभाग