

विरोधी पक्षांतला प्रबळ नगरसेवक निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षात येतोय म्हटल्यावर पक्षातल्या जुन्या ज्येष्ठांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि ते त्या प्रवेशाला जाहीरपणे विरोध करतात. यामुळे अनेकांचे पक्षप्रवेश लटकलेले आहेत. हे आत्ताच्या म्हणजे 2025 च्या निवडणुकीचे वर्णन करतोय, असेच तुम्हाला वाटतेय ना? ही स्थिती आता आहेच; पण पुणे नगरपालिकेच्या 1938 मधल्या निवडणुकीतही असेच वातावरण होते. तब्बल 87 वर्षांपूर्वीचा मानवी स्वभाव अजूनही तसाच आहे. ऐका त्या निवडणुकीतला आचार्य प्र. के. अत्रे यांचा किस्सा...
सुनील माळी
चार्य प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शिक्षण आदी क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिमत्त्व हे सांगण्याची गरज नाही. पण, हे भव्यदिव्य व्यक्तिमत्त्व पुण्याच्या नगरपालिकेत काँग्रेसकडून निवडून आले होते अन् स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून पुण्याला आजही उपयोगी पडत असलेली अनेक कामे केली होती, हे मात्र बहुतेकांना माहिती नसेल. आचार्य अत्रे पुणे नगरपालिकेच्या शिक्षण मंडळावर शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करीत असल्याने त्यांना नगरपालिकेच्या कारभाराची चांगली माहिती होती. पुणे नगरपालिकेची 1938 मधील निवडणूक लढविण्याचे काँग्रेसने ठरविल्याने त्या पक्षाकडून नगरपालिकेत जायचे अत्र्यांनी ठरविले आणि काँग्रेसकडून निवडणुकीला उभे राहण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी पक्षाला कळवूनही टाकले. या निवडणुकीत आणि नंतर कोणत्या रंजक गोष्टी घडल्या? ते त्यांच्याच शब्दांत वाचले, तर अधिक गंमत येईल. (Latest Pune News)
अत्रे लिहितात... ‘मी काँग्रेसमध्ये येणार, ही बातमी काही स्थानिक काँग्रेसजनांना रुचली नाही. बातमी प्रसिद्ध झाली, त्याच दिवशी शनिवारवाड्यासमोर सभा होती. त्यात काकासाहेब गाडगीळ म्हणाले,
‘हे अत्रेमहाशय काँग्रेसमध्ये कोणत्या हेतूने येत आहेत? आमची काँग्रेस म्हणजे पंढरपूरची यात्रा आहे. या यात्रेत हौशे, नवशे अन् गवशेही येतात. या तीनपैकी कोणत्यातरी जातीत अत्रे बसतील, झाले.’ यावर ‘धूर्त बडवे यात्रेकरूंना लुटायला काँग्रेसच्या देवळात मुक्काम करून बसले असताना यात्रेकरूला काय दाद लागणार आहे?’ असे उत्तर मी देणार होतो... निवडणुकीचा प्रचार सुरू झाला. माझ्या लोकप्रियतेने प्रचार मोहिमेचे नेतृत्व आपोआप माझ्याकडे आले. प्रत्येक पेठेतल्या व्याख्यानात माझ्या विनोदाने आणि वक्तृत्वाने मी प्रतिपक्षाचा धुव्वा उडवू लागलो. काँग्रेसच्या शंकरराव देव किंवा काकासाहेब गाडगीळ यांची व्याख्याने अगदी ठरलेली असत. त्यांचे युक्तिवाद सर्वांच्या परिचयाचे झाले होते. मी माझी वाङ्मयीन प्रतिभा घेऊन नव्यानेच काँग्रेसमध्ये आलो होतो. त्यामुळे माझ्या वक्तृत्वाची तऱ्हा लोकांना काही निराळीच वाटत होती...’
‘... निवडणुकीत काँग्रेसचा जय झाला. मी सोमवार-मंगळवार पेठेतून निवडून आलो. साठपैकी चौतीस जागा आम्हाला मिळाल्या. नगरपालिकेची सूत्रे काँग्रेसच्या हाती आली. त्यानंतर पक्षाचा नेता निवडायचा प्रश्न आला. निवडणुका जिंकण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत कुणी घेतली, हे सभासदांना माहिती होते. त्यामुळे माझ्याखेरीज पक्षाचा नेता दुसऱ्याने कुणी व्हावे, ही कल्पनाही त्यांना सहन होण्यासारखी नव्हती. पण, शंकरराव देव आणि काकासाहेब गाडगीळ यांचा मी नेता होण्याला विरोध होता. त्यांनी आचार्य लिमये यांचे नाव सुचविले. त्यांना एकाचाही पाठिंबा नव्हता. काकासाहेब मला म्हणाले, ‘तुम्ही आपले नाव मागे घ्या. तुम्ही काँग्रेसमध्ये नवीन आलेले आहात.’ मी म्हणालो, ‘तुम्ही अशी माझ्यावर बळजबरी करू नका. लोकशाही पद्धतीने पक्षनेता निवडायचे काम स्वतंत्र बुद्धीने सभासदांना करू द्या.’ निवडणूक झाली तर मीच निवडून येईन, हे काकासाहेबांना माहिती होते. म्हणून त्यांनी जंग जंग पछाडले; पण मी काही बधलो नाही. तिघा काँग्रेसश्रेष्ठींपैकी केशवराज जेधे यांचा मला पाठिंबा होता. त्यांनी माझ्या कानात हळूच सांगितले ‘नाव मागे घेऊ नका.’ शेवटी निवडणूक झाली. चौतिसपैकी तेहतीस मते मला पडली. नगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून मीच निवडला गेलो...’ त्यानंतर नगरपालिकेचे अध्यक्ष कुणाला करायचे? हा प्रश्न आला. कायदेमंडळात बहुमतवाल्या पक्षाचा नेता हा जसा मुख्य प्रधान होतो, त्याप्रमाणे नगरपालिकेचे अध्यक्षपदही बहुसंख्य पक्षाच्या नेत्यालाच मिळायला हवे म्हणून ते मलाच मिळायला हवे होते; पण माझी जात अध्यक्षपदाच्या आड आली...’
‘... काय गंमत आहे पाहा. माझे बाह्मण्य नष्ट करण्याचा मी त्यापूर्वी सोळा-सतरा वर्षांपासून प्रयत्न करीत होतो. वाटेल त्याबरोबर जेवलो, वाटेल ते खाल्ले, वाटेल ते प्यालो. मिश्रविवाह केला. शेंडी काढली. जानवे तोडले. वर्षानुवर्षे बाह्मणेतरांत राहिलो आणि देशातला जातीयवाद नष्ट करणे, हीच जिची प्रतिज्ञा त्या काँग्रेसमध्ये शिरलो; पण तिथेच काँग्रेसश्रेष्ठींनी माझी जात नेमकी हुडकून काढली अन् नगरपालिकेचा अध्यक्ष होण्यास मला तेवढ्यावरून अपात्र ठरविले. आता वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे? मला वाटले होते की, ज्या जागेवर हरी नारायण आपटे किंवा नरसिंह चिंतामण केळकर हे महाराष्ट्राचे दोन महान साहित्यिक बसले, त्या जागेवर बसण्याचे भाग्य प्रल्हाद केशव अत्रे या नावाच्या एका तिसऱ्या साहित्यसेवकाला मिळेल; पण कसचे काय अन् कसचे काय..? काही गोष्टींचे आयुष्यात योग नसतात, हेच खरे...’ ‘... त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट एवढीच की, माझे विद्यार्थीसदृश मित्र केशवराव शिरोळे यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनच्या जागी माझी योजना झाली. त्यामुळे व्यक्तिश: जरी मान थोडासा मला कमी मिळाला असला, तरी अधिकाराची सर्व सूत्रे माझ्याच हाती आली आणि काम करण्याच्या दृष्टीने मला कोणतीही उणीव पडली नाही...’ृ
‘... आमच्या काँग्रेसश्रेष्ठींनी दुसऱ्या वर्षी नगरपालिकेचे अध्यक्षपद व्यापाऱ्यांच्या एका प्रतिनिधीला दिले. त्यामुळे काँग्रेसमधले पंधरा सभासद रागारागाने फुटून बाहेर पडले आणि बहुसंख्येने निवडून आलेला काँग्रेस पक्ष हा एका क्षणात अल्पसंख्य बनला. रात्रीचा दिवस करून मी कामाचे डोंगरच्या डोंगर उपसले; पण शंकरराव देव आणि काकासाहेब गाडगीळ यांनी एका शब्दाने मला कधी बरे म्हटले नाही आणि शेवटी याच दोघांनी आपल्या स्वयंमान्य धोरणाने नगरपालिकेतील काँग्रेसच्या बहुमताला सुरुंग लावून त्याचे वाटोळे करून टाकले...’
...हे होते आचार्य अत्रे यांचे आत्मकथन. अर्थात, अत्र्यांनी स्टँडिंग कमिटीच्या म्हणजेच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पुण्याला आजही त्यांची आठवण येईल अशी कामे केली. त्यांनी पुण्याचे बहुतेक सर्व रस्ते डांबरी केले. वेगवेगळ्या बागा-उद्याने उभी केली. प्राथमिक शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले. पुण्याचा शिवाजीनगर भाग सर्वांच्या परिचयाचा आहे, ते नाव भांबुर्डा या भागाला त्यांनी दिले. पुण्यात आत्ताची पीएमपी म्हणजे तेव्हाची बससेवा त्यांनी सुरू केली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुण्याचे भूषण असलेल्या मंडईचे रे मार्केट हे नाव बदलून महात्मा फुले मंडई असे केले... विरोधी नगरसेवकाला आपल्या पक्षात घ्यायला विरोध, आलेल्याच्या विरोधात कारवाया करणे, गटबाजी करणे, महापौरपदाच्या निवडीत जात पाहणे... अत्र्यांचे हे अनुभव ऐकून तुम्हाला आत्ताच्या महापालिकेतील घटनांचीच आठवण येते ना..? या घटनांना शंभर वर्षे होत आली, तरी राजकारणी इथून-तिथून सारखेच एका माळेचे मणी... पटतंय ना..?