PMC Election Politics: प्रभागातील गट-तट ठरणार प्रमुख पक्षांची कटकट; भाजपपुढे उमेदवारीचा पेच; नेत्यांचा लागणार कस
प्रभाग क्रमांक 9 सूस-बाणेर-पाषाण
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत रंगणार
भाजपचे वर्चस्व असलेल्या प्रभाग क्र. 9 मध्ये या वेळेस भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी निश्चित करताना नेत्यांचाच कस लागणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने आता या प्रभागात मोर्चेबांधणी केल्याने भाजप व राष्ट्रवादी यांच्यात लढत रंगणार आहे. महाविकास आघाडी या दोन्हींचा किती सामना करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Latest Pune News)
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सूस, म्हाळुंगे हा प्रभाग क्रमांक 9 बराचसा 2017 प्रमाणेच केला असून, यामध्ये नवीन समाविष्ट सूस व म्हाळुंगे ही गावे घेतली आहेत. 2017 साली या ठिकाणी असलेले राष्ट्रवादीचे प्राबल्य कमी करीत भारतीय जनता पक्ष या प्रभागात तीन गटांत आपले उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी ठरला होता, तर राष्ट्रवादीला कशीबशी एक जागा राखण्यात यश मिळाले होते. जर महायुती झाली नाही तर राष्ट्रवादी भाजपला रोखण्यात यशस्वी ठरणार का? की हाती न आलेली एक जागाही भाजप राष्ट्रवादीकडून हिरावून घेणार? असा सामना रंगणार असल्याचे चित्र प्रभाग 9 मध्ये दिसू लागले आहे. या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजेच महाविकास आघाडीला काही फायदा होईल का? याची चाचपणीही महाविकास आघाडी सध्या करीत आहे. एकंदरीतच, प्रभागातील निवडणूक रंगतदार होणार असून, भाजपचे पारडे थोडे जड असले तरी उमेदवार कोण? यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.
या प्रभागात भाजप व राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्राबल्य असल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रामुख्याने सोसायटी वर्ग जास्त असल्याने त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. भाजपचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उत्तर मंडल या ठिकाणी कार्यरत आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात हा प्रभाग येत असून, तेही ताकद पुरविण्याचे काम करीत आहेत. परंतु, सध्या राष्ट्रवादीच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा, माजी नगरसेवकांसह अन्य इच्छुकांनी लावलेला प्रभागातील कामांचा धडाका पाहता तसेच अनेक वर्षे रखडलेली कामे मार्गी लावत असल्याने याचा फायदा त्यांच्या पदरात कितपत पडणार, हा येणारा काळच ठरवेल. 2017 मध्ये भाजपने दिलेली आश्वासने कितपत पूर्ण केली व नागरिकांच्या समस्या किती प्रमाणात सोडविल्या, काही समस्या सोडविण्यात त्यांना अपयशही आल्यामुळे मतदारांचा कल कोठे वळणार? हेदेखील निर्णायक ठरणार आहे.
या प्रभागात एसटी प्रवर्गाचे आरक्षण निश्चित आहे. यामुळे चार जागांतील एक जागा आरक्षणास गेल्यास उरलेल्या तीन जागांसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या 16 इतकी सर्वाधिक आहे. गत वेळेस निवडून आलेले तीन माजी नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या तयारीत आहेत. त्यात आणखी इच्छुकांची भर पडली आहे. त्यामुळे उमेदवारी देताना नेत्यांचा कस लागणार आहे. पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची शक्यताही नकारता येत नाही. काही इच्छुकांनी मला संधी मिळत नसेल तर कुटुंबातील महिलेला संधी द्यावी, अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सात उमेदवार इच्छुक असून, यामध्येही उमेदवारी कोणाला मिळणार? सध्या प्रभागामध्ये सुरू असलेल्या गटातटाच्या राजकारणाचा तोटाही या प्रभागात राष्ट्रवादीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीचे दोन वेगवेगळे गट झाल्याने त्यांची ताकद विभागली आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचे चार-पाच उमेदवार तयार असून, भाजप व राष्ट्रवादीतील (अजित पवार गट) बंडखोर महाविकास आघाडीच्या गळाला लागले, तर प्रभागात महाविकास आघाडीची ताकद वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीतच आरक्षण, उमेदवारी, बंडखोरी, पक्षांतर्गत राजकारण, नागरिकांचा बदलता कल, या सर्व गोष्टींचा विचार करता या प्रभागातील निवडणूक रंगतदार होणार आहे.
मतदारांचा कल ठरणार अंतिम
2017 मध्ये ज्या पद्धतीने तुल्यबळ उमेदवारांचे गट बदलल्याने समोरासमोर लढती झाल्या नाहीत; या वेळी या लढती समोरासमोर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गट बदलण्याचा फटका पाषाण सुतारवाडीतील भागांना बसला व या ठिकाणी एकही उमेदवार निवडून आला नाही. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी पाषाण सुतारवाडीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत असल्याने या निवडणुकीत येथील मतदारांचा कल बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पक्षानुसार इच्छुक उमेदवारांची यादी : महायुती ः भाजप : अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, विशाल गांधीले, उमा गाडगीळ, रोहन कोकाटे, सचिन पाषाणकर, सचिन दळवी, शिवम बालवडकर, शिवम सुतार, स्नेहल महाडिक (सुतार), धनश्री भोते, नारायण चांदेरे, पियंका चिवे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) : बाबूराव चांदेरे, प्रमोद निम्हण, सुषमा निम्हण, रोहिणी चिमटे, पूनम विधाते, राहुल बालवडकर, समीर चांदेरे, मनोज बालवडकर, साधना सुतार, बालम सुतार. शिवसेना शिंदे गट : अमित निकाळजे, महाविकास आघाडी ः काँग्रेस : तानाजी निम्हण, जीवन चाकणकर, मंगेश निम्हण, दत्ता जाधव, रोहित धेंडे, राजश्री जाधव, पवन खरात. शिवसेना (उद्धव ठाकरे) : डॉ. दिलीप मुरकुटे, संजय निम्हण, ज्योती चांदेरे, मयूर भांडे, महेश सुतार, अशोक दळवी, संतोष तोंडे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : जयेश मुरकुटे, संदीप बालवडकर, योगेश सुतार, राजेश बालवडकर. मनसे : सुहास निम्हण, अनिकेत मुरकुटे, सारिका मुरकुटे, मयूर सुतार, शिवम दळवी, गणेश चव्हाण.

