

निवडणूक... कालची, आजची
सुनील माळी
'उमेदवार जोतिराव गोविंदराव फुले... एका वॉर्डात शून्य मते, तर दुसऱ्या वॉर्डात दोन मते...' नगरपालिकेच्या १८८३ च्या निवडणुकीचा निकाल देताना असाच पुकारा झाला असेल. महात्मा फुले म्हटले की 'मुलींची पहिली शाळा काढणारा पहिला भारतीय' अशीच प्रतिमा उभी राहाते. पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल... महात्मा जोतिराव फुले हे आपल्या पुण्याचे सरकारनियुक्त नगरसेवक होते आणि त्यांनी गरिबांचा-दलितांचा-कष्टकऱ्यांचा आवाज नगरपालिकेत पोचवला तसेच तिथे लढाही दिला, नंतर निवडणूक लढवली आणि पराभूतही झाले...(Latest Pune News)
पुणे पालिका आणि महात्मा फुले यांच्याबाबतचे आश्चर्य एवढ्यावरच थांबत नाही. पाहा पुढचे मुद्दे... पुण्याची आजचे भूषण असलेली भाजी मंडई उभी करायला फुल्यांनी पालिकेत विरोध केला होता; पण पुढे त्यांचेच नाव त्या मंडईला देण्यात आले. महापालिकेच्या दारातून आत आल्यावर तुम्हाला फुल्यांचा जो भव्य पुतळा दिसतो, तो बसविण्यासाठी तब्बल पंचेचाळीस वर्षे संघर्ष करावा लागला होता. पुण्याची आधी नगरपालिका असलेली आणि आता महापालिका झालेली स्थानिक स्वराज्य संस्था शहराच्या नागरी व्यवस्थेचा गाडा गेली तब्बल १६८ वर्षे हाकते आहे. या जवळपास पावणेदोनशे वर्षांच्या कालखंडातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा या संस्थेशी संबंध आला. महात्मा फुले हे त्यातलेच एक. मुलींची पहिली शाळा काढणारा पहिला भारतीय आणि शेतकऱ्यांपासून ते कष्टकरी हमाल-गवंड्यांपर्यंत, दलितांपासून ते ब्राह्मण विधवांपर्यंतच्या सर्वांसाठी आयुष्य वेचणारा समाजसेवक अशीच फुल्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. पण, महात्मा फुले हे पुण्याचे नगरसेवकही होते, याची आणि नगरसेवक फुल्यांनी केलेल्या कामांची माहिती बहुतेकांना नसते.
पेशवाई संपून ब्रिटिशांची राजवट सुरू झाली आणि १८५७ ला नगरपालिका स्थापन झाली, तरी पाणीपुरवठा-मिळत नसल्याची तक्रार होती. नगरपालिकेतील अधिकारी ब्राह्मण असल्याने ब्राह्मणांच्या वस्तीला भरपूर पाणी-दिवे आणि गरिबांच्या वस्त्यांना या सेवांचे दुर्भिक्ष अशी टीका जोतिराव करीत. त्यांच्या या तक्रारींची दखल घेत ब्रिटीश सरकारने त्यांना नगरपालिकेचे सदस्य नेमले. जोतिरावांनी १८७६ ते १८८२ या काळात नगरसेवक म्हणून काम केले. ते नगरपालिकेच्या कारभारात उत्साहाने भाग घेत आणि गरिबांच्या वेदनाही पालिकेत मांडत.
स्वागत समारंभासाठी पालिकेकडून होणाऱ्या खर्चावर विरोधक आणि त्यापेक्षाही स्वयंसेवी संस्था टीका करताना आपण आजकाल पाहतो. मात्र, नगरसेवक जोतिरावांनी अशाच खर्चाला विरोध केला होता. ब्रिटीश सरकारचे व्हॉईसरॉय लॉर्ड लिटन हे पुण्याला भेट देणार होते. त्यानिमित्ताने शहर सुशोभित करण्यासाठी एक हजार रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावास ३२ पैकी ३१ सदस्यांनी पाठिंबा दिला. पण, एकट्या जोतिरावांनी त्याला विरोध केला. ते म्हणाले, 'व्हॉईसरॉय साहेबांच्या मानपत्रासाठी पैसा खर्च करण्याऐवजी पुण्यातील गरिबांच्या शिक्षणासाठी ती रक्कम खर्च केली, तर तिचा अधिक चांगला उपयोग होईल.'
दारूच्या व्यसनावर बरीच वर्षे बोलले जाते आहे. पण, दारूगुत्ते वाढविण्याच्या निर्णयाविरोधात नगरपालिकेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष प्लंकेट यांना जोतिरावांनी कडक भाषेत पत्र लिहिले. 'शहराचे आरोग्य सांभाळण्याच्या नगरपालिकेच्या उद्देशाला यामुळे बाध येतो आहे... यामुळे अनेक कुटुंबांचा नाश होतो आहे... दारूगुत्त्यांवर नगरपालिकेने कर बसवावा...' असे त्यात म्हटले होते. अखेरीस 'दारूगुत्त्यांवर कर बसवता येत नाही; पण ते गुत्ते कमी करता येतील,' अशी आशा आहे, असा गुळमुळीत ठराव संमत झाला. नगरपालिकेसाठी पत्र्यांची खरेदी करताना भरमसाट पैसा खर्च केला, या कारणावरून नरसो रामचंद्र या अधिकाऱ्याविरोधात जोतिराव आणि हरी रावजी चिपळूणकर यांनी अविश्वासाचा ठरावही मांडला होता.
आपली मुदत संपत आली की माननीय नगरसेवक कामे मंजूर करण्याची, निविदा मान्य करण्याची अर्थपूर्ण घाई करतात, स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकांत मंजुरीची कोट्यवधींची उड्डाणे होतात, हे आपण गेली काही वर्षे पाहतो; पण दीडशे वर्षांपूर्वीच्या पुण्यातही हीच प्रवृत्ती होती, हे पाहून आश्चर्य वाटते.
महापालिकेची मुदत संपत आली असताना नवी मंडई बांधण्यासाठी येणाऱ्या सव्वातीन लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता घेणारा ठराव ४ डिसेंबर १८८२ ला मांडण्यात आला. हा पैसा गरिबांच्या शिक्षणासाठी खर्च व्हावा, असे जोतिरावांनी सुचविले आणि ठरावाला विरोध केला. मात्र, दोनशे दुकानांची सोय असणारी मोठी मंडई खासगीवाले आणि चिमय्या यांच्या बागेच्या जागी बांधण्यात आली. आश्चर्य म्हणजे मंडईचा हा वाद केवळ तिच्या मंजुरीपुरता मर्यादित राहिला नाही, तर १८८५ मध्ये मंडई बांधून तयार झाली तरी तिच्यातील गाळ्यांचे भाडे गरीब दुकानदारांना सहन न झाल्याने ते मंडईत जाईनात. 'गरीब विक्रेते दररोज माल खरेदीसाठी आठ आणे किंवा एक रुपया सावकाराकडून कर्ज काढतात आणि उन्हातान्हात सर्व वस्त्यांमधून फिरून तो विकतात. कचेरीत काम करणारा ब्राह्मणवर्ग हाच त्यांचा मुख्य ग्राहक. तो मीतव्ययी आणि काटकसरीने वागणारा. भाडे द्यायला लागल्याने भाजीचे दर वाढवले तर तो भाजी विकत घेणार नाही, त्यामुळे गरीब व्यापाऱ्यांकडून भाडे घेऊ नये,' अशी सूचना जोतिरावांनी केली. या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी पालिकेतील विरोधी सभासदांनी घाण घेऊन जाणाऱ्या गाड्य मुद्दाम जोतिरावांच्या घरावरून पाठवायला सुरुवात केली. त्यावर संतापून जोतिराव म्हणाले, 'ह्या म्युनिसिपालिटीचे नाव माझ्यासमोर काढू नको...'
... जोतिरावांचा नगरपालिकेत असा छळ झाला तरी काळाने त्यांना न्याय दिला. ज्या मंडईला त्यांनी विरोध केला, त्याच मंडईच्या इमारतीवर आज 'फुले मंडई' असेच नाव झळकते आहे, तर ज्या पालिकेत त्यांनी हिरिरीने काम केले, त्याच पालिकेची आज महापालिका होऊन तिच्या प्रांगणात फुल्यांचा भव्य पुतळा उभा आहे. पुण्यात आणि पालिकेत जोतिरावांना सनातन्यांकडून विरोध झाला, एवढेच नव्हे तर त्यांचा पुतळा बसवायलाही पंचेचाळीस वर्षे विरोध होत राहिला... पण, तो विरोध पचवून आज जोतिराव महापालिकेत उभे आहेत... इथे दीनदुबळ्यांच्या हिताचा कारभार होतो आहे का नाही, यावर लक्ष ठेवायला...