पिंपरी : शारीरिक व्यंग कमी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा स्वीकार

पिंपरी : शारीरिक व्यंग कमी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा स्वीकार

पिंपरी(पुणे) : सौंदर्य वाढीसाठी प्लास्टिक सर्जरी करून घेण्याकडे पिंपरी-चिंचवड शहर परिसरात कल कमी आहे. त्याउलट जन्मजात शारीरिक व्यंग कमी करण्यासाठी, जळीत रुग्णांना आलेला विद्रुपपणा घालविण्यासाठी किंवा काही अवयव तुटल्यानंतर त्यासाठी प्लास्टिक सर्जरी करण्यात येत आहे. चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री यांच्याप्रमाणे दिसण्याच्या इच्छेतून बरेच जण कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करून घेत असतात. पिंपरी-चिंचवड परिसरात मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे.

उच्चभ्रू वर्गातच अशा शस्त्रक्रिया करून घेण्याकडे कल आहे. त्याचे प्रमाण केवळ दीड टक्क्यापर्यंतच आहे. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये प्रामुख्याने कानावरील, चेहर्‍यावरील गाठी कमी करणे, चेहर्‍यावरील डाग, मुरुम, खड्डे यांच्यापासून सुटका करून घेणे त्याचप्रमाणे नाक, जबडा, गाल आदींची देखील शस्त्रक्रिया केली जाते.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातदेखील प्लास्टिक सर्जरी करण्यात येते. मात्र, येथे प्रामुख्याने जन्मजात व्यंग असलेली मुले, शरीराचे काही अवयव तुटल्याने आलेले व्यंग, जळित रुग्णांना आलेला विद्रुपपणा कमी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली जात आहे. ही शस्त्रक्रिया करतानाही त्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असल्यास ती कमी खर्चात होते.

दरमहा आठ ते दहा शस्त्रक्रिया

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत दरमहा 8 ते 10 प्लास्टिक सर्जरी केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने जन्मजात व्यंग असलेली मुले, जळित रुग्णांचा विद्रुपपणा कमी करण्यासाठी त्वचा जोडण्याचे काम केले जाते. त्याशिवाय, शरीरातील अवयवांमध्ये विशेष फ्रॅक्चर असेल तर त्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. त्याचप्रमाणे, हाताच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात, अशी माहिती रुग्णालयाचे प्लास्टिक सर्जन डॉ. राहुल निकम यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news