

टाकवे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा
आंदर मावळ परिसरात भात शेती मशागतीच्या कामाला वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे. शेताचे तुटलेले बांध दुरुस्ती करताना, भात रोपे तयार करण्यासाठी पालापाचोळा गोळा करून भाजणी करताना, तसेच शेतात शेणखत टाकणे; तसेच ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी करताना शेतकरी वर्ग दिसून येत आहे. सध्या आंदर मावळ परिसरात सगळीकडे शेतीच्या कामाची लगबग दिसून येत आहे.
मृग नक्षत्राच्या आगमनापूर्वी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकर्यांनी शेतीच्या मशागतीकडे लक्ष दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या परिसरात भात हे पीक मुख्य असून गुढीपाडव्यानंतर नांगरणी, कोळपणी, बांधाची दुरुस्ती करून भात रोपे तयार करण्याची कामे टप्प्याटप्प्याने केली जात आहेत.
हवामान खात्याकडून मिळालेल्या मान्सून आगमनाच्या माहितीमुळे मावळातील खरीप हंगामापूर्वीच्या मशागतीच्या कामांना शेतकर्यांकडून सुरुवात झाली आहे.तर काही कामे अंतिम टप्प्यात आहे. भातशेतीच्या नव्या हंगामाच्या शेतीच्या कामांना सुरुवात करून शेतकरीराजा पुन्हा त्याच उमेदीने शेतीसाठी सज्ज झाला आहे.
मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतकर्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मात्र हे नुकसान भरून काढण्यासाठी यंदा पुन्हा एकदा बळीराजाने कंबर कसली आहे. यासाठी शेतीपूर्व मशागतीच्या कामांना विविध भागांत सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी शेतामध्ये परंपरागत राब केला जात आहे.
म्हणजेच शेतातील पालापाचोळा, शेण, काट्याकुट्या त्यावर पेंडा, गवत टाकून पेटवला जात आहे. असे केल्यामुळे शेतातील अनावश्यक तण नष्ट होऊन जमीन भाजली जाते आणि यामुळे जमीन अधिक कसदार होण्यास मदत होते. भाताची पेरणी केल्यावर रोपात तण उगवून वाढू नये, हा त्यातील मुख्य हेतू असल्याचे शेतकरी सांगतात.
मृग नक्षत्रात करावयाच्या पेरणीसाठीची मशागत सुरू आहे. भात खाचरात बैलजोडीच्या मदतीने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत केली जात आहे. शेतीच्या या महत्त्वाच्या पहिल्या टप्प्यानंतर पाऊस पडण्यापूर्वी जमीन नांगर किंवा ट्रॅक्टरने नांगरली जाते. ज्यामुळे जमिनीची उखळणी होते. यानंतर खर्या अर्थाने बियाणे पेरणीचा हंगाम सुरू होतो.
शेताच्या बांधाची दुरुस्ती, पावसाळ्यात पडलेल्या शेताच्या नाल्याची दुरूस्ती याच महिन्यात केली जाते. वावरात शेण खत आणि उकिरडयावरील खत टाकण्याच्या कामे केली जात आहेत. मावळ तालुक्यात ऊस बांधणीला सुरुवात झाली आहे.ऊस हे कृषी औद्योगिकदृष्टया महत्वाचे नगदी पिक आहे.
उसाच्या शाश्वत आणि अधिक उत्पादनासाठी पूर्व मशागत, आंतरमशागत अशी अनेक कामे वेळच्या वेळी होणे व योग्य पध्दतीने होणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे शेतकरी आता मशागतीची कामे करण्यात व्यस्त आहे.
मान्सूनपूर्वी वळवचा एक पाऊस होणे आवश्यक आहे. वळवाचा पाऊस झाल्याने जमीन भिजून बांधबंदिस्ती योग्य झाली की, नाही हे समजून येते; परंतु मान्सूनचा पाऊस सुरु झाला की, शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून बांध फुटणे, माती वाहून जाण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे मान्सून सुरु होण्यापूर्वी वळवाचा पाऊस पडणे गरजेचे आहे.
-मुकुंद पवार, शेतकरी.