वीजवाहिनीची तार अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

file Photo
file Photo

वडगाव मावळ : शेतातील गवत काढत असताना वीजवाहिनीची तार अंगावर पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. संपूर्ण गावाचा लाडका 'भाऊ' असलेल्या तरुणाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कांब्रे ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. श्रीकांत गणपत गायकवाड (वय 33, रा. कांब्रे नामा, ता.मावळ, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी व रविवारी कंपनीला सुटी असल्याने श्रीकांत सकाळीच शेतात गेला होता. तो खासगी कंपनीत चिंचवड येथे काम करत होता. शेतातील गवत काढत असताना त्याच्या अंगावर वीजवाहिनी तुटून पडली. विजेच्या तीव्र झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली; परंतु याबाबत कोणालाही समजले नाही. दुपारच्या वेळी बाजूच्या शेतात काम करणार्‍या व्यक्तीला श्रीकांत शेतात पडला असल्याचे दिसले, त्यानंतर त्यांनी ही माहिती त्याच्या कुटुंबाला दिली. शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुलं, दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.
या घटनेमुळे तालुक्यातील वीज विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

पावसाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. धोकादायक वीज खांब, वीजवाहिन्यांची वेळीच दुरुस्ती केली जात नाही. वारंवार जीवित व वित्त हानीच्या घटना होत आहेत. धनिकांना वीजपुरवठा त्वरित मिळतो, शेतकरी व गरिबांना लवकर वीज मिळत नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यावर वीज कर्मचारी फोन उचलत नाहीत. धोकादायक वीज खांब व वीज वाहिन्या त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news