डबर टाकून भामा आसखेडचा जलसाठा बुजविल्याचा धक्कादायक प्रकार

डबर टाकून भामा आसखेडचा जलसाठा बुजविल्याचा धक्कादायक प्रकार

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा :  भामा आसखेड धरणाच्या जलसाठ्यात सुरू असलेल्या जॅकवेलच्या खोदाईकामात निघालेला काळ्या पाषाणाचा कडक डबर (गौणखनिज) जलसंपदा विभागाने सुचविलेल्या मोकळ्या जागेत न टाकता संबंधित ठेकेदाराने धरणाच्या पाण्यात टाकून अक्षरशः भामा आसखेड धरणाचा जलसाठा बुजविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकाराकडे जलसंपदा विभाग व मनपा अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने संबंधित ठेकेदाराने पाण्यात डबर टाकण्याचा सपाटा लावून पाणीसाठा बुजविला आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात करंजविहिरे येथील भामा नदीवर 8.14 टीएमसी पाणीसाठा क्षमतेचा भामा आसखेड धरण प्रकल्प आहे. या धरणावरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकरिता पाणी योजना होणार आहे. वाकी तर्फे वाडा येथील जलसाठ्यातील गट नंबर 23, 25, 28 व 36 पैकी एकूण 1 हेक्टर 20 आर क्षेत्रावर जॅकवेल, अँप्रोच बि—ज व उपकेंद्र बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने सन 2021-22 ते सन 2025-26 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी महानगरपालिकेस भाडेपट्ट्याने जागा दिली आहे. जॅकवेल, अँप्रोज बि—ज आणि सबस्टेशनचे काम मे. गोंडवाना इंजिनिअर्स लिमिटेड आणि मे. टी अँड टी इन्फ—ा (टी अँड टी म्हणजे तांदूळकर आणि थोरवे) लिमिटेड ही ठेकेदार एजन्सी काम करीत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामासाठी ठेकेदाराने मोठी यंत्रसामग्री लावून काम सुरू केले आहे.

वाकी तर्फे वाडा येथील धरणाच्या जलसाठ्यात जॅकवेलचे काम 90 फुटांपर्यंत खोल होणार असून, सध्या 30 फूट खोल काम झाले आहे. जॅकवेल कामाची खोदाई करताना काळा पाषाण दगड (गौणखनिज) लागला असून, तो पोकलेन यंत्राने फोडला जात आहे. त्यानंतर फोडलेला दगड हायवा ट्रकमध्ये भरून जॅकवेलच्या भिंतीलगतच्या पाणीसाठ्यात टाकण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जॅकवेलचे काम सुरू असून, आतापर्यंत निघालेला लाखो ट्रक खडक डबर पाण्यात टाकल्याने धरणाचा पाणीसाठा बुजविण्याचे काम ठेकेदार एजन्सीने केले आहे. हा गंभीर प्रकार जलसंपदा विभाग भामा आसखेड धरणाचे कार्यालय करंजविहिरेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर सुरू आहे. तरीही ही धक्कादायक बाब जलसंपदा अधिकार्‍यांच्या निदर्शनास आली नाही, हे विशेष.

जॅकवेल कामातील निघालेले गौणखनिज मटेरिअल टाकण्यासाठी करंजविहिरे धरण कॉलनीची मोकळी जागा दिली आहे. परंतु, संबंधित ठेकेदाराने येथे मटेरिअल का टाकले नाही? याची चौकशी करून पाण्यात टाकलेल्या डबरची पाहणी केली जाईल.
                              – ए. के. पवार,सहायक अभियंता, भामा आसखेड धरण

जॅकवेल कामातील निघालेले डबर आम्हाला पाण्यात टाकायला अधिकार्‍यांनी सांगितले आहे. जलसंपदाच्या धरणातील निघालेले मटेरिअल आम्ही त्यांच्याच जागेत नाही तर कुठे टाकणार? मटेरिअल टाकून जलसाठा बुजविलेल्या जागेत सबस्टेशन होणार आहे.
                                            -लोकेश यादव, साइट मॅनेजर, जॅकवेल काम

धरणाच्या पाणीसाठ्यात डबर टाकत आहेत, नाहीतर मग ते कुठे टाकणार? प्रत्यक्ष पाहणी करून पाणीसाठा कमी होत आहे का? ते पाहिले जाईल.
                 – विवेक गजपुरे, कनिष्ठ अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

धरणाच्या पाण्यात डबर टाकून पाणीसाठा बुजविणे हे अतिशय चुकीचे आहे. कनिष्ठ अधिकार्‍यांना सांगून प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. पाण्यात डबर टाकणे मुळात मोठी चूक आहे.
                         – एस. एन. गुंजाळ, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news