

Pune Elections: लोकशाहीचा सण साजरा करण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी बुधवारी पुणे शहर, जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. राजकीय, सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या घराजवळील मतदान केंद्रावर जात मतदान केले.
पुण्यातील आठ मतदार संघातील मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्या पासूनच नागरिकांची मतदान करण्यासाठी यायला सुरुवात झाली. प्रशासनाकडूनही मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने नागरिकांची मतदान केंद्रांवरील गर्दी वाढली. मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र दिसले. ज्येष्ठ नागरिक, नव मतदार तरुण-तरुणी, अभिनेते, तृतीयपंथी यांनी आपल्या घराजवळील मतदारसंघावर मतदान करत मतदानाचा हक्क बजावला.
यंदा प्रशासनाकडून मतदारांच्या सोयीसाठी पाळणाघर हिरकणी कक्ष यांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर आणि त्यांच्याच मदतीसाठी स्वयंसेवकांची देखील व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला.
दरम्यान पुणे व परिसरात राहणाऱ्या अभिनेत्यांनी देखील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करून आपले योगदान दिले. पर्वती मतदार संघातून प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर हिने आपल्या कुटुंबीयांसह मतदान केले. तर कसबा पेठ मतदारसंघातून सुबोध भावे यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदान केले.
नटरंग चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी देखील पिंपरी चिंचवड भागातून मतदान केले. यासोबतच पुणे आणि परिसरातील माजी खासदार, माजी आमदार, माजी नगरसेवक, राजकीय नेते मंडळीं सह उमेदवारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.