तुझे करिअर बनवेल सांगत, अकॅडमीच्या संचालकाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

तुझे करिअर बनवेल सांगत, अकॅडमीच्या संचालकाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये रहा, असे म्हणत क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेख याने दहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेखसह एका तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद अहमद शेख (वय 58) याच्यासह एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 16 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 30 जानेवारी रोजी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नौशाद शेख हा शहरात क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली निवासी शाळा चालवतो. महाराष्ट्रातील मुले आरोपीच्या निवासी शाळेत येतात. दरम्यान, सन 2021 मध्ये शेख याने यवतमाळमध्ये जाऊन अशाच प्रकारे सेमिनार घेतला होता. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिचा नववी इयत्तेमध्ये निवासी शाळेत 2 लाख 26 हजार रुपये भरून प्रवेश घेतला होता. दरम्यान, सन 2022 मध्ये आरोपीने तो राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित मुलीला बोलावून घेतले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली.

त्यानंतर आरोपी मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला. नोव्हेंबर 2022 मध्येदेखील दिवाळीच्या सुटीमध्ये आरोपीने तिचा विनयभंग केला होता. तसेच, पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपी मुलीसमोर आरोपीने पीडित मुलीबाबत अश्लील शेरेबाजी केली. त्यानंतर मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपी तरुणीने पीडित मुलीला शेख याच्याबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दोन वर्षे केला अत्याचार सहन

पीडित मुलीने सुमारे दोन वर्ष अत्याचार सहन केल्यानंतर मला यापुढे येथे शिकायचे नाही. मला घरी घेऊन चला, असे पालकांना सांगितले. गावी गेल्यानंतरही मुलीने झालेल्या प्रकाराबाबत कोणालाही सांगितले नाही. ऑगस्ट 2023 ते जानेवारी 2024 कालावधीमध्ये मुलगी घरात कोणाशी बोलत नव्हती, दरम्यान, मुलीने अकॅडमीच्या काही माजी विद्यार्थिनींशी मोबाईलद्वारे संपर्क केला. त्या वेळी एका माजी विद्यार्थिनींनी, मी देखील अशाच काही प्रकारांना सामोरे गेली आहे. मात्र, त्यावेळेस मी हे कुणाला सांगितले नाही. तू तुझ्या आई-वडिलांना हा सर्व प्रकार सांग, जेणेकरून तुला न्याय मिळेल आणि यापुढे अन्य कुठल्या मुलीबरोबर असे घडणार नाही, असा सल्ला दिला. त्यानुसार, 11 जानेवारी 2024 रोजी मुलीने तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकारची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर पालक मुलीला घेऊन पोलिस आयुक्तालयात आले. पोलिसांनीदेखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींना बेड्या ठोकल्या.

75 हून अधिक मुली धोक्यात

आरोपीच्या शाळेमध्ये सध्या सुमारे 75 मुली आणि शंभरहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. या मुलींना मोबाईल वापरण्यास तसेच कुटुंबाशी संपर्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. महिन्यातून एकदाचा मीटिंगसाठी आलेले पालक मुलींना भेटू शकतात, असा येथील नियम आहे. त्यामुळे येथे घडणार्‍या गैरप्रकाराची माहिती पालकांपर्यंत वेळीच पोहोचू शकत नाही.

यापूर्वीही झाली होती अटक

आरोपी शेख यांच्या विरुद्ध अकॅडमीतील एका विद्यार्थिनीने 30 ऑक्टोबर 2014 रोजी लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याच अकॅडमीमध्ये शिकत असणार्‍या इतर विद्यार्थिनींनीही असे प्रकार घडत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. या वेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news