चाकण येथील ‘ती’ घटना खून नव्हे, अपघात | पुढारी

चाकण येथील ‘ती’ घटना खून नव्हे, अपघात

चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत डोक्याचा चेंदामेंदा झालेला मृतदेह आणि जवळच एक मोठा दगड मिळून आल्याची घटना गुरुवारी (दि. 1) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी दिसून आलेल्या परिस्थितीमुळे पोलीस देखील चक्रावले. ही घटना म्हणजे खुनाचा प्रकार असल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना देखील आला. संपूर्ण चाकण शहरात खून झाल्याची वार्ता पसरली. मात्र चाकण पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाबींचा तपास केल्यानंतर हा प्रकार म्हणजे खून नव्हे तर अपघात असल्याची बाब समोर आली.

चाकण पोलिसांनी या अपघातप्रकरणी बसचालक कृष्णा शिंदे (रा. झगडेवस्ती चाकण, ता. खेड) यास ताब्यात घेतले आहे. चाकण मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास कृष्णा आपल्या ताब्यातील बस (एमएच 14 जेएल 8008) वळवत असताना याच ठिकाणी झोपलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यावरून बसचे चाक गेले. त्यातच संबंधित अनोळखीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घाबरलेला बसचालक तसाच निघून गेला. सकाळी तेथे डोक्याचा चेंदामेंदा झालेला मृतदेह आणि त्या शेजारी दगड मिळून आल्याने पोलिसही चक्रावले; त्यामुळे हा खून की अपघात, याबाबत संभ्रम निर्माण झाला. चाकण ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली चाकण गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, बापू सोनवणे, निखील शेटे, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, महेश कोळी यांनी सूक्ष्म तपास केला.

परिसरातील सीसीटीव्ही तपासले. संशयित बस चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर या अपघाताच्या घटनेचा उलगडा झाला आहे.
दरम्यान अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी बस चालकास अटक केली आहे. चाकण पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

 

Back to top button