पुनर्वसन जमीन घोटाळा : ‘आल्हाद’दायक व्यवहारांच्या चौकशीची मागणी

पुनर्वसन जमीन घोटाळा : ‘आल्हाद’दायक व्यवहारांच्या चौकशीची मागणी

यवत : पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरालगत असणार्‍या पुनवर्सन जमिनी 'आल्हाद'दायक पध्दतीने पासलकर नामक दलालाने कवडीमोल भावाने खरेदी करून धरणग्रस्तांना लाखो रुपयांचा चुना लावला असून, या सर्वच जमिनींच्या व्यवहारची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. पुनर्वसन जमिनींच्या वादातून शुक्रवारी दौंड शहरात घडलेलं 'देशी कट्टा' नाट्य आता चांगलंच जोर धरू लागलं असून, याला पासलकर नामक दलालाचे अनेक कारनामे कारणीभूत आहेत. सुमारे 30 वर्षांपासून या दलालाने या भागात अक्षरशः जमीन व्यवहारात नंगा नाच घातला आहे. आपलाच भाऊबंद आहे म्हणून पुनर्वसनची जमीन खरेदी करायची आणि या जमिनीवर दौंड शहर परिसरातील नागरिकांना कमी किमतीत घरे देतो म्हणून अ‍ॅडव्हान्स रक्कम घेऊन अनेक नागरिकांची फसवणूक या महाभागाने केली आहे. असा हा दुहेरी फसवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

जमिनी खरेदी करणे, जमिनींवर ताबा मिळवणे आणि नंतर त्याच जमिनींवर गृहप्रकल्प उभे करणे यासाठी त्याने दौंड शहरातील राजकीय दबदबा असलेला एका नेता पूर्वीच पकडला असून, आपला भागीदारदेखील करून घेतला आहे. या नेत्यानेसुद्धा या दलालाची सर्व उलटीपालटी कामे आपल्या बुद्धीने मार्गी लावली असून, आपला वाटादेखील बिनचूक घेतला आहे; परंतु शुक्रवारी घडलेल्या या प्रकाराने पासलकर नामक दलाल बाजूला राहिला आणि नेत्यालाच अवघड गोष्टीला तोंड देत बसावे लागले आहे.

या प्रकारामुळे दौंड शहरात व शहरालगत असणार्‍या सर्वच पुनवर्सन जमिनींची आणि खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाण्यात गेलेली जमीन, त्यातून सोडावं लागलेलं गाव व नंतर झालेलं पुनर्वसन आणि पुन्हा झालेली फसवणूक यातून धरणग्रस्त शेतकरी बांधव अक्षरशः पिळून निघाला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी संयुक्त स्वतंत्र पथक (एसआयटी) नियुक्त करून चौकशी करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news