आजरा साखर कारखाना निवडणूक : मतमोजनीत चुरस, संमिश्र निकालाच्या संकेतामुळे कार्यकर्त्यांमध्ये घालमेल | पुढारी

आजरा साखर कारखाना निवडणूक : मतमोजनीत चुरस, संमिश्र निकालाच्या संकेतामुळे कार्यकर्त्यांमध्ये घालमेल

आजरा; कृष्णा सावंत : गवसे येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी झालेल्या मतमोजणीत चूरस दिसून येत आहे. सकाळी उत्तूर गटात ६५० ते ७०० ची असणारी राष्ट्रवादीची आघाडी दुपारनंतर १०० वर आल्याने अत्यंत चूरशीची लढत होत असल्याचे दिसून येत आहे. निकालाचा कल पाहता क्राँस वोटींगवर निकाल अवलंबून आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेल वाढली असून संमिश्र निकालाचे संकेत मिळत आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी प्रणित रवळनाथ शेतकरी विकास आघाडी आणि भाजप, काँग्रेस, दोन्ही शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी यांच्यात लढत झाली. माघारी दिवशी श्री चाळोबा देव विकास आघाडीचे भटक्या विमुक्त गटातील संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राष्ट्रवादी आघाडीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के.पी पाटील यांनी प्रचारसभा घेतल्या तर श्री चाळोबा देव आघाडीसाठी आमदार सतेज पाटील यांनी प्रचारसभा व पत्रकार बैठका घेतल्या.दोन्ही आघाडीच्या प्रमूखांनी एकमेकावर जोरदार टिका केली होती. कांहीनी खालच्या पातळीवर जाऊन टिका केल्याने निवडणूकित तणाव निर्माण झाला होता.

पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरवात झाली.सकाळी १० वाजेपर्यंत दोन्ही आघाडीमध्ये चूरस दिसत होती. पाचही गटामध्ये क्राँस वोटींगचे प्रमाण वाढताना दिसत होते.त्यामुळे उपस्थित उमेद्वार त्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये घालमेल दिसत होती.सकाळी साडे दहापर्यंत उत्तूर गटात ६५०ची आघाडी होती तर अन्य चार गटात अत्यंत चूरशीची लढत दिसून येत होती. भादवण,गजरगाव येथे दोन्हीही आघाड्यांना समान मते दिसून येत होती.

दुपारपर्यंत उत्तूरची ६८०ची असणारी आघाडी १००वर आल्याने मतमोजणीत पुन्हा चुरस निर्माण झाली.दरम्यान ‘ब’वर्गात अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी आघाडीचे नामदेव नार्वेकर ३६ मतांनी पुढे राहीले तर पुढच्या मतपेटीतील मतमोजणीत चाळोबा देव आघाडीचे अशक तर्डेकर ४ मतांनी पुढे राहीले. त्यामुळे नार्वेकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली.

Back to top button