पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'आगामी महापालिका निवडणुकीत भाजपबरोबर युती होणार नाही. करायची असल्यास, त्याचा निर्णय मी घेईन,' असे सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर भूमिका स्पष्ट केली. 'पक्षसंघटना बळकट करा, त्या जिवावर तुम्ही निवडून येणार आहात. भाजपच्या जिवावर तुम्ही मोठे होणार नाहीत,' असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पुण्यातील विधानसभानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेताना ठाकरे यांनी बुधवारी हे भाष्य केले. या बैठकीला शाखाप्रमुख, विभाग उपाध्यक्ष, शाखा उपप्रमुख यांनाच प्रवेश होता. शहरातील पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांची बैठक शुक्रवारी घेण्यात येणार असून, बुधवारी व गुरुवारी होणार्या बैठकीत त्यांना बोलावण्यात आले नव्हते. ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतानाच, त्यांना पक्षसंघटना वाढविण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात, याच्या सूचना दिल्या. ठाकरे यांनी केलेले मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांनी मांडलेले मुद्दे, याची माहिती बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी सांगितली.
कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत ठाकरे म्हणाले, 'राज ठाकरे व पक्ष म्हणून मी मतदारांपर्यंत पोहचलो आहे. आता तुम्ही मतदारांना घरोघरी जाऊन भेटा. जनसंपर्क वाढवा. सोशल मीडियाचा वापर कमी करा. पक्षातील भेद विसरून एकत्र काम केल्यास पक्षाची ताकद वाढेल. त्यामुळे तुम्ही विजयी होऊ शकाल.'
ते म्हणाले, 'मी मुंबईतून पुण्यात तुमच्यासाठी येतो. तुम्ही एकमेकांना पाडण्यात गर्क असाल, तर मग काय उपयोग? भाजपशी युती होणार की नाही, याची चर्चा करू नका. त्यांच्याकडून काही निरोप आल्यास, काय करायचे ते मी ठरवीन. सध्या सर्वांनी पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित करावे. मी सांगितलेले येत्या महिनाभरात न ऐकल्यास, मी तुम्हाला बदलेन. 'शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला व हडपसर या विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांनी तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कसबा पेठ, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी या मतदारसंघात ते गुरुवारी संपर्क साधणार आहेत. कार्यकर्त्यांनीही त्यांना विविध प्रश्न विचारीत, शंकानिरसन करून घेतले. ठाकरे यांच्यासोबत सरचिटणीस अनिल शिदोरे, बाबू वागस्कर आणि बाळा शेडगे बैठकीला उपस्थित होते. भेटीदरम्यान ठाकरे यांनी काही कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे पाहुणचार घेतला.
प्रश्नोत्तरात कोथरूडमध्ये एका कार्यकर्त्याने विचारणा केली की, सुरुवातीला तुम्हीच मोदी यांना मोठे केले. त्यांच्यामागे उभे राहिलात. त्यावेळी राज ठाकरे उत्तरले, 'मला त्यावेळी माहिती नव्हते, ते असे निघतील, असे वाटले नव्हते. चांगले काम करीत आहेत, असे वाटल्याने मी पाठिंबा दिला होता.'