पुणे : ‘मुन्नाभाई’, ‘सर्किट’ आडकले पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : ‘मुन्नाभाई’, ‘सर्किट’ आडकले पोलिसांच्या जाळ्यात
  • एक वैद्यकीय क्षेत्रातील, तर एक नर्सिंगचा विद्यार्थी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यसनासाठी, मैत्रिणींना महागडे गिफ्ट देण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये खरेदीच्या बहाण्याने जाऊन सोन्याचे दागिने लंपास करणार्‍या एका वैद्यकीय क्षेत्रातील आणि एका नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेल्या सोन्याच्या अंगठ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अनिकेत हनुमंत रोकडे (रा. राधाकुंज निवास, महात्मा गांधी कॉलेजजवळ, नागोबानगर, अहमदपूर, लातूर), वैभव संजय जगताप (वय 22, रा. मु. पो. कैवाड कैनवड, ता. रिसोड, जि. वाशिम) अशी दोघांची नावे आहेत. आरोपी अनिकेत रोकडे हा बी.ए.एम.एस. व वैभव संजय जगताप बी.एस्सी. नर्सिंगचे शिक्षण घेत आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रांका ज्वेलर्स दुकानात दोन अनोळखी तरुण मास्क लावून सोने खरेदीच्या बहाण्याने आत गेले. तेव्हा त्यांनी अंगठ्या दाखवण्यास सांगून, दाखवलेल्या अंगठ्यांपैकी त्या अंगठ्या निवडल्या, त्याच दरम्यान दोन तरुणांपैकी एक दुकानातून बाहेर गेला, त्यानंतर दुकानातील कामगार पाठीमागे वळून सोन्याचा ट्रे ठेवत असताना दुकानात असलेला दुसर्‍या तरुणाने 3 अंगठ्या घेऊन दुकानाबाहेर पळत आला आणि आधीच मोटारसायकलवर बसलेल्या साथीदारासह भरधाव वेगाने तेथून पोबारा केला.

आरोपी सीसीटीव्हीत कैद

हडपसर येथील घटनेच्या पूर्वी त्याच दिवशी याच तरुणांनी कोथरूड येथील ब्लू स्टोन ज्वेलर्स या दुकानातून अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने अशाच प्रकारे सोन्याच्या अंगठ्या चोरून पळ काढल्याचा गुन्हा अलंकार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. ज्वेलर्सच्या दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे आरोपी कैद झाले होते. मात्र, तोंडाला मास्क लावल्यामुळे आरोपीची ओळख पटत नव्हती.

पोलिसांना पाहिजे असलेले हे 'मुन्नाभाई' व 'सर्किट' हे आरोपी पुणे-सोलापूर रोड शेवाळवाडी येथील आकाश लॉन्स येथे असल्याचे एका खबरीने माहिती दिल्यानंतर तपास पथकातील पोलिसांनी सापळा रचून दोघांना गजाआड केले व त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले. व्यसनासाठी व मैत्रिणींसोबत चैनीकरिता व गिफ्ट देण्यासाठी वरील चोर्‍या केल्या असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

ही कामगिरी हडपसर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलिस अंमलदार प्रदीप सोनवणे, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, समीर पांडुळे, प्रशांत टोणपे, निखिल पवार यांच्यासह तपास पथकातील पोलिस कर्मचार्‍यांनी पार पाडली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news