इथेनॉल पुरवठ्यांतून देशातील कारखान्यांना मिळाले तब्बल 20 हजार कोटी रुपये

Ethanol
Ethanol
Published on
Updated on
  • 275 आसवणी प्रकल्पांकडून ऑईल कंपन्यांना पुरवठा

  • 333 कोटी लिटरपैकी 302.30 कोटी लिटर पुरवठा पूर्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशातील 275 आसवनी प्रकल्पातून ऑईल कंपन्यांना 30 नोव्हेंबरअखेर संपलेल्या इथेनॉल वर्ष 2020-21 मध्ये 333 कोटी लिटर निविदांपैकी विक्रमी 302.30 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात यश आले आहे. त्यातून कारखाने मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. कारण एकाच वर्षात इथेनॉल पुरवठ्याच्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न इथेनॉल पुरवठादारांना मिळाले असून ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे. तर देशभरात सरासरी 8.1 टक्के मिश्रणाचे प्रमाण गाठले गेले आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 मधील 59 लाख टन साखर निर्यातीनंतर वर्ष 2020-21 मध्येही विक्रमी 72 लाख टन साखरेची यशस्वी निर्यात झालेली आहे. यंदाच्या वर्षी साखर निर्यातीतदेखील देशभरातील साखर कारखान्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच 35 लाख टन अनुदानविरहित साखर निर्यातीचे करार झालेले आहेत. यामध्ये सहकारी साखर कारखानदारीचा वाटा सुमारे 40 टक्क्यांइतका असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी कळविले आहे.

दरम्यान, देशातील गाळप हंगाम जोमाने सुरु आहे. चांगले पाऊसमान, शास्त्रीय पद्धतीने केलेली उसाची लागवड, संशोधित वाण व हमी दर, यामुळे देशातील ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. देशभरातील 471 साखर कारखान्यात आतापर्यंत (15 डिसेंबर) 820 लाख टन उसाचे गाळप झाले असून त्याचा सरासरी साखर उतारा 9.22 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच 75 लाख टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन तयार झाले आहे.

यंदा महाराष्ट्राची साखर उत्पादनात आघाडी

देशात चालू वर्षातील ऊस गाळप हंगामाअखेर ते 315 लाख टन होण्याचा अंदाज आहे. यात महाराष्ट्राने आघाडी मारली असून येथील 184 साखर कारखान्यांनी सर्वाधिक म्हणजे 31.90 लाख टन साखरेचे उत्पादन तयार केले आहे. हंगाम अखेर महाराष्ट्र 110 लाख टनाचे साखर उत्पादन करून यंदा देशात प्रथम क्रमांकावर राहील असे दिसते. त्या खालोखाल उत्तरप्रदेशाचा क्रमांक असून तेथील 117 साखर कारखान्यात 18.60 लाख टनाहुन अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. तर हंगामाअखेर ते 107 लाख टन होण्याचा अंदाज आहे. तृतीय क्रमांकावरील कर्नाटक राज्यातील 69 साखर कारखान्यांतून 17.90 लाख टन नवे साखर उत्पादन तयार झाले आहे. तर हंगामअखेर 48 लाख टनांचा साखर उत्पादनाचा अंदाज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news