

पुणे : पुढारी वृत्तसेवा
भाजपने पुणे महापालिकेत गेल्या निवडणुकीत 97 जागा मिळवल्या होत्या. आता आगामी निवडणुकीत तो आकडा शंभरी पार जाईल, असा दावा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपण नगरसेवकांचा आकडा शंभरीपार कसा न्यायचा यासंदर्भात चर्चा केल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुणे महापालिकेच्या निमित्ताने भाजपच्या एक बैठकीत पदाधिकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी हा दावा केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या सभागृहात भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत बाहेरच्या कुणालाही प्रवेश नव्हता. मात्र बैठकीतून बाहेर आल्यानंतर राणे यांनी पत्रकरांशी संवाद साधला.
साहित्य संमेलनात गिरिश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणावर मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले. शिवसेना यूपीए सोबत जवळीक करत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, 'हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याचा भाजपला फार फरक पडणार नाही', असे त्यांनी स्पष्ट केले.