समाजकारण 'युट्यूब', 'फेसबुक'वर पोस्ट टाकण्याएवढे सोपे नाही : दिलीप मोहिते-पाटील | पुढारी

समाजकारण 'युट्यूब', 'फेसबुक'वर पोस्ट टाकण्याएवढे सोपे नाही : दिलीप मोहिते-पाटील

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा : “स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार आहात याचे भान असू द्या”, असा थेट समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते घेतला.

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (दि. ५) वाकी, संतोषनगर येथे आयोजित केला होता. यावेळी आमदार मोहिते बोलत होते.

यावेळी जिल्हा बँकेचे मतदार प्रतिनिधी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, सुरेखाताई मोहिते, अरुण चांभारे, अनिलबाबा राक्षे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, अशोक राक्षे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, उपसभापती वैशाली गव्हाणे, पीएमआरडीए मंडळ संचालक वसंत भसे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, राजगुरूनगर बँकेचे उपाध्यक्ष अरुण थिगळे, नवनाथ होले, सुभाष होले आदी उपस्थित होते.

आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, “खेड तालुक्यातील निर्णय घेताना विचारात घेत नाही. तालुक्यात परस्पर येऊन कार्यक्रम करता आणि ज्यांनी निवडणुकीत जीवाचं रान करून निवडून आणले, त्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांना सोडून आमच्या विरोधकांना बरोबर घेता, हे बरं नाही. समाजकारण हे ‘युट्यूब’, ‘फेसबुक’वर पोस्ट टाकण्याएवढे सोपे नाही. ज्यासाठी तुम्हाला योग्य समजून मते दिली त्या लोकांचे  काम करा”, असा सल्लाही डॉ. कोल्हे यांना आमदार मोहिते यांनी दिला.

“पुणे जिल्हा दूध संघात सध्याचा अध्यक्ष या पाठीमागे कोणीही केला नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहे. संघातील डांबरट संचालक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याने सत्ता उपभोगत आहेत. मात्र, पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन दूध उत्पादकांची लूट करीत आहेत. त्यांच्या विरोधात तक्रार केली, त्यात तथ्य आहे. मात्र महाआघाडीचे तीन पक्षाचे सरकार असल्याने कारवाई होऊ शकत नाही”, असंही दिलीप मोहिते पाटील यांनी  सांगितले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरही खेड तालुक्याचे सर्वात अधिक नुकसान केल्याचा आरोप केला. कैलास मुसळे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचलंत का ?

Back to top button