गृहनिर्माण संंस्थांचे 601 ’डीम्ड कन्व्हेयन्स’ पूर्ण; जिल्हा उपनिबंधकांची माहिती

गृहनिर्माण संंस्थांचे 601 ’डीम्ड कन्व्हेयन्स’ पूर्ण; जिल्हा उपनिबंधकांची माहिती

[author title="किशोर बरकाले" image="http://"][/author]

 पुणे : सहकारी गृहनिर्माण संस्थेला मानीव अभिहस्तांतरणामुळे (डीम्ड कन्व्हेयन्स) जमिनीचा मालकी हक्क प्राप्त होत असून, या कामासाठी गतवर्ष 2023-24 मध्ये जिल्हा उपनिबंधक शहर कार्यालयाने आजवरचे सर्वाधिक 601 डीम्ड कन्व्हेयन्सचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर) संजय राऊत यांनी दिली. मानीव अभिहस्तांतरणात जमीन अथवा विकसक अथवा बिल्डर यांच्या नावावर संस्था ज्या भूखंडावर उभी आहे, त्या भूखंडाची मालकी संस्थेच्या नावे करून देण्यासाठी पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यातून गतवर्षी 485 संस्थांच्या नावे भूखंडाचे खरेदीदस्त करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 51 टक्क्यांपेक्षा अधिक सदनिकांची विक्री झाल्यानंतर विकसकाने तत्काळ सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी स्वतःहून करणे अभिप्रेत आहे.

काही ठिकाणी विकसक संस्था नोंदणी करण्यास इच्छुक नसतात. अशा प्रकरणांत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने गतवर्ष 2023-24 मध्ये 146 संस्थांच्या विकसकाच्या सहकार्याशिवाय गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्यात आलेली आहे. डीम्ड कन्व्हेयन्समुळे संस्थेचा पुनर्विकास होण्याकरिता व त्याचे सर्व फायदे सहकारी संस्था, त्यांच्या सभासदांना होण्याकरिताही ते महत्त्वाचे आहे. दरम्यान, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड महानगरात 22 हजार 500 गृहनिर्माण संस्था, 15 हजार अपार्टमेंट्स असून, त्यापैकी 25 हजार डीम्ड कन्व्हेयन्स पूर्ण झालेले आहेत.

40 टक्के संस्थांचे कन्व्हेयन्स बाकी

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरात 40 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे सात हजार 500 संस्थांच्या जमिनीची मालकी गृहनिर्माण संस्थेच्या नावे झालेली नाही. अशा संस्थांनी तातडीने प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे.

सहकार विभागाची मोहीम कौतुकास्पद असून, सर्वाधिक 601 'डीम्ड कन्व्हेयन्स' पूर्ण केले आहे. सर्व संस्थांची माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व शासकीय विभागांच्या समन्वयासाठी संपूर्णपणे ऑनलाइन प्रक्रिया राबवावी, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

– सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघ

क्र.        वर्ष            आदेश
1.     2019-2020     272
2.    2020-2021      550
3.    2021-2022      415
4.    2022-2023      564
5.    2023-2024      601

एकूण                    2402

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news