चालक बापाची अनोखी सेवानिवृत्ती; वाहक मुलाने घेतले खांद्यावर

चालक बापाची अनोखी सेवानिवृत्ती; वाहक मुलाने घेतले खांद्यावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एसटीतील प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेल्या एसटी चालक (ड्रायव्हर) असलेल्या वडिलांसोबत शेवटची ड्युटी करून त्यांना खांद्यावर घेत बसमधून उतरत डेपोत चाललेल्या वाहक (कंडक्टर) मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. या व्हिडीओची एसटी वर्तुळासह सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम या माध्यमावर 'एमएसआरटीसी फॅन' या खात्यावरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्याला हजारोंच्या घरात लाइक मिळाले असून, लाखोंनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ आष्टी आगारातील असल्याची माहिती 'एमएसआरटीसी फॅन' खात्यावरून देण्यात आली आहे.

मात्र, या व्हिडीओमुळे एसटीच्या वर्तुळात एक भावुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, एसटीकडील प्रत्येक वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍याच्या स्टेटसला देखील हा व्हिडीओ लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडीओबाबत एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांना संपर्क केला असता, त्यांनी हा व्हिडीओ बाप-लेकाचा असून, महामंडळाकडील कर्मचार्‍यांचाच असल्याचा दुजोरा दिला आहे.

सोशल मीडियावरून अभिनंदनाचा वर्षाव

या व्हिडीओवरून बाप-लेक एकाच आगारात कार्यरत होते. एसटी चालक बाप ज्या दिवशी निवृत्त होणार होता, त्याच दिवशी त्याच्या मुलाला म्हणजे वाहकाला त्याच गाडीवर ड्युटी लावण्यात आली होती. ती संपल्यावर गाडी आगारात आली. मुलाने बापाला फेटा बांधत, गाडीतील उतरायच्या जिन्यातूनच खांद्यावर घेत कार्यालयात निघाला. त्याचा हा व्हिडीओ येथील कर्मचारी सहकार्‍यांनी काढल्याचे दिसत आहे. या व्हिडीओला शेकडोंच्या घरात कमेंट आल्या असून, मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

एसटीबद्दल समाजमानसात आपुलकीचे वातावरण आहे. आमच्याकडील आगारांमध्ये दोन ते तीन पिढ्या या व्हिडीओप्रमाणे गुण्यागोविंदाने काम करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. एसटी ही कर्मचार्‍यांसाठी परिवारच आहे. व्हायरल व्हिडीओ महामंडळाकडील असून, तो नक्की कोणत्या आगाराचा आहे, हे निश्चित सांगता येणार नाही.

– सचिन भुजबळ, कामगार अधिकारी, एसटी, पुणे विभाग

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news