बारामतीत एक्झिट पोलचा कार्यकर्त्यांना धसका; दोन्ही गटांतील धाकधूक वाढली

बारामतीत एक्झिट पोलचा कार्यकर्त्यांना धसका; दोन्ही गटांतील धाकधूक वाढली

बारामती : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघा एक दिवसाचा अवधी उरला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा देशात हाय व्होल्टेज ठरली. येथील निकालाचे भाकीत करणे भल्याभल्यांना अशक्य झाले आहे. त्यात शनिवारी (दि. 1) जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्येही वेगवेगळी मतांतरे दिसून आली. परिणामी, कार्यकर्ते कमालीचे तणावात गेले आहेत. कधी एकदा निकाल लागतो, अशी त्यांची स्थिती झाली आहे. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी जोरदार लढत पाहायला मिळाली. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार अशी थेट लढत झाली.

उमेदवार या नणंद-भावजय असल्या तरी येथे खरी परीक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आहे.
दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात आपापल्या उमेदवारासाठी जिवाचे रान केले. प्रचाराच्या काळात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली. त्यातून कटुता वाढत गेली. मतदान 7 मे रोजी पार पडले. निकालासाठी तब्बल 27 दिवस वाट पाहावी लागली. दोन्ही गट आपापल्या विजयाचा दावा करीत आहेत. शनिवारी विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले. त्यात काहींनी खासदार सुळे या जागा राखत असल्याचे, तर काहींनी जागा गमावत असल्याचे दाखविले. त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.

निकालावर पुढील गणिते

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालावर बारामतीत अनेक गणिते अवलंबून आहेत. आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होतील. राष्ट्रवादीचा शरद पवार गट त्यासाठी आत्तापासूनच कामाला लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका लढण्याचे या गटाने जाहीर केले आहे. दुसरीकडे अजित पवार आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकसभेला काही दगाफटका झाला, तर विधानसभेला वेगळा विचार करेन, असे त्यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news