अरुणाचल प्रदेशात पुन्हा भाजप सरकार

अरुणाचल प्रदेशात पुन्हा भाजप सरकार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेचे निकाल लागले. या निकालांनी एक्झिट पोलच्या अंदाजातील वास्तवाचे संकेतच जणू दिले. रविवारी लागलेल्या निकालात भाजपने अरुणाचल प्रदेशमध्ये 60 पैकी 46 जागा जिंकल्या. या राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) तीन जागा मिळाल्या आहेत. सिक्कीम विधानसभेत सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने (एसकेएम) 32 पैकी 31 जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवले. एसकेएम हा एनडीएचाच घटकपक्ष आहे. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, सिक्कीममध्ये पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. काँग्रेसला अरुणाचल प्रदेशात केवळ एक जागा मिळवता आली.

भाजपने अरुणाचल प्रदेशात 10 जागा आधीच बिनविरोध जिंकल्या होत्या. अरुणाचल आणि सिक्कीम विधानसभेसाठी 19 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान झाले. अरुणाचल प्रदेश विधानसभेत एकूण 60 जागा आहेत. यावेळी भाजप 46 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अरुणाचलमध्ये भाजपने 42 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, सिक्कीममध्ये लोकसभा निवडणुकीत एसकेएम एनडीएमध्ये आहे. मात्र विधानसभा निवडणूक त्यांनी स्वतंत्रपणे लढवली आहे. सिक्कीम विधानसभेत एकूण 32 जागा आहेत. 32 पैकी 31 जागा मिळवत एसकेएमने दणदणीत विजय मिळवला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत एसकेएमने 17 जागा मिळवत बहुमत मिळवले होते. गेल्या वेळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला (एसडीएफ) यावेळी मात्र एकच जागा मिळाली आहे.

इंडिया आघाडी देशात 295 जागा जिंकणार

नवी दिल्ली : शनिवारी आलेल्या एक्झिट पोलचे अंदाज इंडिया आघाडीने धुडकावले असून, इंडिया आघाडी देशात 295 जागा निश्चित जिंकेल, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

रविवारी काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी एक्झिट पोल हा एक मानसशास्त्रीय खेळ असून, तो मोदींचा मीडिया पोल आहे. हे आकडे म्हणजे मोदींची फँटसी असून, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. इंडिया आघाडी देशात 295 जागा जिंकणार आहे, असेही ते म्हणाले. बैठकीत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, हे एक्झिट पोल खोटे आहेत. इंडिया आघाडीला 295 पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा हे विरोधी पक्ष, निवडणूक आयोग, मतमोजणी एजंट, रिटर्निंग ऑफिसर यांच्यावर दबाव आणून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, काँग्रेस पक्ष कर्नाटकमध्ये दोन तृतीयांश जागा जिंकेल. देशातील जनतेला बदल हवा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news