तहसीलदार हल्ला प्रकरण सीआयडीकडे द्या: कर्मचार्‍यांची मागणी

तहसीलदार हल्ला प्रकरण सीआयडीकडे द्या: कर्मचार्‍यांची मागणी

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर 24 मे रोजी सकाळी गौणखनिज उत्खननावर कारवाई केल्याचा राग मनात धरून हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर इंदापूर पोलिसांनी पाच जणांसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करीत तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार असल्याने इंदापूर येथील महसूल कर्मचार्‍यांच्या वतीने हल्ला झालेल्या घटनेपासून बेमुदत 'काम बंद' आंदोलन सुरूच आहे.

या घटनेचे पोलिसांना गांभीर्य नसून या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्याची मागणी निवेदनाद्वारे कर्मचार्‍यांनी केली आहे. 'काम बंद' आंदोलनामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, तरी याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून याबाबत नागरिकांची गैरसोय टाळण्याची मागणी होत आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना इंदापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदापूर तहसीलदारांवर सराईत गुन्हेगार व वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये शासकीय वाहनाचे झालेले नुकसान पाहता हल्ला हा तहसीलदारांना ठार मारण्याच्या हेतूने करण्यात आलेला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

मुख्य आरोपी अद्यापही मोकाटच

तहसीलदार हे तालुका प्रशासनाचे प्रमुख असून, ते तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी आहेत. एवढ्या प्रमुख पदावरील अधिकार्‍यावर झालेला हल्ला हा अत्यंत निंदनीय आहे. या हल्ल्यानंतर सर्व कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकारी हे पोलिस ठाण्यात गेले असता या हल्ल्यामधील प्रमुख आरोपीचे गुंड हे पोलिस ठाण्याच्या आवारात मोकाट फिरत होते. याबाबत पोलिस निरीक्षकांना सांगूनही त्यांनी या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

पोलिसांनी अद्यापही सर्व आरोपींना अटक केलेली नाही. यावरून इंदापूरचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मनात स्थानिक पोलिसांबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. आमच्या कार्यालयाचे प्रमुखच सुरक्षित नसतील तर आम्हा स्थानिक व परगावावरून येणार्‍या कर्मचार्‍यांच्या जीवितास धोका असल्याची असुरक्षित भावना आमच्या मनात निर्माण झालेली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस हे घटनेचा खोलवर तपास करीत नाहीत, असेही दिसून येत आहे. गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या सर्व आरोपींची नावे निष्पन्न झालेली आहेत. तरीही पोलिसांनी अद्याप सर्वांना अटक केलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी स्थानिक पोलिसांचे कार्य दखलपात्र नसल्याने या गुन्ह्याचा तपास हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात यावा, अशी आपणाकडे मागणी करण्यात येत आहे.

'काम बंद' आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय

दरम्यानच्या काळात सर्व आरोपी स्थानबद्ध होत नाहीत तोपर्यंत आमच्या कर्मचारी संघटनेने सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये निवडणूक काम वगळता इतर कोणतेही काम न करण्याचा आम्ही सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आमचा तपास सुरू असून, पोलिस यंत्रणा आरोपींना अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.

आरोपींच्या कोठडीत वाढ

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील हल्लाप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींना बुधवार (दि. 29) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तीनही आरोपींच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली. दरम्यान, याप्रकरणी आणखी एक आरोपी महेश काळे (रा. अवसरी, ता. इंदापूर) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 1 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिल्याची माहिती इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी दिली.

याबाबत पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे अधिक माहिती देताना म्हणाले की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी शिवाजी किसन एकाड (रा. बाब—समळा, इंदापूर), विकास नवनाथ देवकर (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर), पिन्या ऊर्फ प्रदीप कल्याण बागल, तेजस अनिल वीर, माऊली ऊर्फ शुभम महादेव भोसेकर (तिघे रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यापैकी पिन्या ऊर्फ प्रदीप कल्याण बागल, तेजस अनिल वीर, माऊली ऊर्फ शुभम महादेव भोसेकर (तिघे रा. भाटनिमगाव) या तिघांना घटना घडल्यानंतर तत्काळ अटक करण्यात आली होती. त्या वेळी न्यायालयाने त्यांना 29 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्याने बुधवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ केली तसेच याप्रकरणी तपास सुरू असताना नव्याने एक आरोपी निष्पन्न झाला. महेश काळे (रा. अवसरी, ता. इंदापूर) असे त्याचे नाव असून, त्यालाही अटक करण्यात आली. उर्वरित आरोपी शिवाजी किसन एकाड व विकास नवनाथ देवकर यांचा शोध सुरू असल्याचे कोकणे यांनी सांगितले.

कर्मचार्‍यांशी चर्चा करून यावर तत्काळ मार्ग काढून कामकाज सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊ.

– वैभव नावडकर
बारामतीचे उपविभागीय अधिकारी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news