pune porsche accident : रक्त बदलण्याचा बिल्डरला डॉ. तावरेचाच सल्ला!

pune porsche accident : रक्त बदलण्याचा बिल्डरला डॉ. तावरेचाच सल्ला!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्त बदलण्याचा सल्ला बिल्डरला डॉ. अजय तावरे यानेच दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. वैद्यकीय चाचणीसाठी दिलेले मुलाच्या रक्ताचे नमुनेच बदलले, तर त्याची अलगद सुटका होईल, असे वाटल्यामुळे बिल्डरनेही सहज तयार होत तावरेसोबत मोठी आर्थिक डील केल्याचा संशय आहे. यासाठी डॉ. तावरेला आणखी कोणी संपर्क साधला होता का, या अनुषंगानेही पोलिस तपास करत आहेत.

तपासादरम्यान मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि प्रथमोपचार विभागाचा डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना सोमवारी (दि.27) पहाटे अटक केली. सध्या दोघे पोलिस कोठडीत आहेत. गुन्हे शाखेकडून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. बिल्डरने ससूनमधील शवविच्छेदनगृहातील शिपाई अतुल घटकांबळे याच्यामार्फत डॉ. तावरे याच्यासोबत संपर्क केला. बिल्डरने या प्रकरणात मदत करण्याची विनंती केली. त्या वेळी तावरे याने बिल्डरला अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुनेच बदलण्याचा सल्ला दिला.

रक्त बदलल्यानंतर मद्य प्राशन केल्याचा अहवाल येणार नाही. पुढे त्याचा फायदा केसला होईल, असे सांगितले. ससूनमध्ये तावरेचे नाव मोठे आहे, याची माहिती बिल्डरला होती. त्यामुळे बिल्डर हा तावरेचा सल्ला घेण्यास तत्काळ तयार झाला. पुढे शिपाई घटकांबळे आणि डॉ. हाळनोर या दोघांच्या मार्फत ठरलेल्या योजनेला मूर्तरूप दिले. वैद्यकीय चाचणीसाठी मुलाला जेव्हा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा हाळनोर याने त्या मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले खरे, मात्र प्रत्यक्ष रेकॉर्डवर दाखवताना दुसर्‍याचेच ठेवले. घटकांबळे याने आर्थिक व्यवहार करण्याबाबत भूमिका बजावली. परंतु, पोलिसांच्या तपासात त्यांचे बिंग फुटले अन् तिघांना अटक झाली. दरम्यान, तावरे याने बिल्डरला रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला दिलाच कसा, हाही एक प्रश्न आहे. नेमका दोघांमध्ये किती मोठा आर्थिक व्यवहार झाला? की अन्य कोणी यामध्ये भूमिका बजावली? या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. तावरे याच्याकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत. सुरुवातीपासून तावरे आपल्याला बिल्डरने केवळ रुग्णालयात चांगली वागणूक देण्यासाठी फोन केल्याचे सांगत होता.

डॉ. तावरेच्या घराची पोलिसांकडून झडती

डॉ. अजय तावरेच्या कॅम्प परिसरातील गीता सोसायटीत असलेल्या घरी गुन्हे शाखेने मंगळवारी (दि.28) रात्री उशिरा झडती घेतली. त्याचबरोबर इतर दोन आरोपींच्या घराची देखील पोलिसांनी झडती घेतली आहे. तावरे याला अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्याच्या घरातून नेमके पोलिसांनी काय जप्त केले, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

ते रक्त कोणाचे? अद्याप गुलदस्तातच

डॉ. तावरे व डॉ. हाळनोर यांनी या प्रकरणात रक्त बदलले हे समोर आले असले, तरी ते नेमके कोणाचे घेतले, हे गुलदस्तातच आहे. त्याबाबत मात्र पोलिसांनी गुप्तता पाळली आहे. त्याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

ते पैसे नेमके कोणी दिले?

डॉ. हाळनोर याला तीन लाख रुपये मिळाले. ते पैसे जप्त केले आहेत.
डॉ. हाळनोर व शिपाई अतुल घटकांबळे या दोघांकडून ती रक्कम जप्त केली आहे. मात्र, हे पैसे कोणामार्फत आले व कोणी दिले आहेत, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर

शासकीय नोकराला एखाद्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर नियमानुसार त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येते. डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर या दोघांना निलंबित करण्याबाबतचा अहवाल पोलिसांनी शासनाकडे सादर केला आहे.

तावरे चिरीमिरीही सोडत नसे

तावरे याने पैसे घेण्याबाबत हद्द सोडल्याचे समजते. प्रत्येक प्रकरणात त्याला पैसेच दिसत असल्याचे बोलले जाते. प्रकरण मॅनेज करून देण्यासाठी तावरे पाच अंकी आकड्यांच्या भाषेपासून सुरुवात करत होता. त्यानंतर तो चिरीमिरीच काय तर चहा, नाष्टा देखील समोरच्या व्यक्तीकडून मागवून घेत असल्याचे सूत्र सांगतात.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news