प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करा: निवडणूक निर्णय अधिकारी

प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करा: निवडणूक निर्णय अधिकारी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी येत्या मंगळवारी (दि. 4) सकाळी आठपासून म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे. ही मतमोजणी प्रक्रिया शांतेत व शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी निवडणुकीतील 33 उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मंगळवारी (दि. 28) केले.

निवडणुकीच्या रिंगणात एकूण 33 उमेदवार होते. मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार आणि त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी आकुर्डी येथील पीएमआरडीए येथे बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.

येत्या मंगळवारी क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सील मतमोजणीच्या दिवशी सकाळी 6.30 ला उघडण्यात येईल. मतमोजणीसाठी लावण्यात आलेल्या टेबलची संख्या तसेच, मतमोजणी फेर्यांची माहिती आणि मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचार्यांची माहिती सिंगला यांनी दिली.

मतमोजणी कक्षात प्रवेशावेळी दोन स्तरावर तपासणी

मतमोजणी प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने पुरविलेल्या ओळखपत्राद्वारे तसेच, उमेदवाराने दिलेल्या नमुना 18 ची दुय्यम प्रत तपासून आणि घोषणापत्रावर सही घेऊनच मतमोजणी परिसरामध्ये प्रवेश दिला जाईल. उमेदवारांना मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देताना त्यांची दोन स्तरावर तपासणी केली जाईल.

ओळखपत्र परिधान करणे अनिवार्य

मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक विभागाने दिलेले ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. मतदान प्रतिनिधी एकदा मतमोजणी कक्षातून बाहेर गेल्यानंतर त्यास पुन्हा मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. एखाद्या उमेदवाराने किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधीने किंवा मतमोजणी प्रतिनिधीने मतमोजणी परिसरामध्ये शिस्तीचा भंग केल्यास तात्काळ कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे सिंगला यांनी सांगितले. मतमोजणी प्रतिनिधीचे ओळखपत्र सोमवार (दि.1) पूर्वी संबंधित उमेदवार अथवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावे, अशी सूचना दीपक सिंगला यांनी दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news