विकेंडमुळे सिंहगड, राजगडावर पर्यटकांची गर्दी : टोलवसुलीही जोरात | पुढारी

विकेंडमुळे सिंहगड, राजगडावर पर्यटकांची गर्दी : टोलवसुलीही जोरात

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुट्या संपत आल्याने रविवारी (दि.26) सिंहगड, राजगडासह खडकवासला पानशेत परिसर पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. सकाळी साडेदहा वाजताच सिंहगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाल्याने डोणजे, गोळेवाडी तसेच कोंढणपूर टोलनाक्यावरून पर्यटकांना माघारी जावे लागले. त्यामुळे शेकडो पर्यटकांचा हिरमोड झाला. शनिवारी व रविवारी अशा दोन दिवसांत सिंहगडावर जाणार्‍या वाहनचालक पर्यटकांकडून वनविभागाने तब्बल दोन लाख 15 हजार रुपयांचा टोल वसूल केला.

गेल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस पडल्याने डोंगर, टेकड्या हिरवाईने बहरल्या आहेत. अधुनमधून थंडगार वारे वाहत आहेत. कांदा भजी, झुणका भाकरीचा आस्वाद घेत पर्यटक जागा मिळेल तिथे बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद अनुभवत होते. सिंहगडावर दिवसभरात 20 हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. अतकरवाडी तसेच कल्याण दरवाजा पायी मार्ग तरुणाईने ओसंडून वाहत होते.

दुपारनंतर पानशेत रस्त्यावरील वाहतूक कोलमडली

खडकवासला धरण चौपाटीवर पर्यटकांनी गर्दी केल्याने पानशेत रस्त्यावरील वाहतूक दुपारनंतर कोलमडली. हवेली पोलिस ठाण्याचे अधिकारी, जवान तसेच जलसंपदा विभागाचे सुरक्षा रक्षक तसेच स्थानिक कार्यकर्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.

राजगडला चार हजारांहून अधिक पर्यटकांची भेट

राजगड किल्ल्यावर दिवसभरात चार हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती. सातारा, पुणे, कोल्हापूर येथून मोठ्या संख्येने तरुण, शालेय विद्यार्थी आले होते. गडावर पिण्याचे पाणी नसल्याने खासगी पाणी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू होता. राजगडचे पुरातत्व विभागाचे पहारेकरी बापू साबळे , पवन साखरे, विशाल पिलावरे आदी सुरक्षा रक्षक गडावर तळ ठोकून होते. गडाच्या पायथ्याच्या पाल खुर्द येथील खंडोबा माळावरील वाहनतळ सकाळी साडेदहा वाजताच दुचाकी व चारचाकी वाहनांनी हाऊसफुल्ल झाला होता.

रविवारी सकाळी गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याने घाट रस्त्यावर वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे सकाळी घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी, अनेक पर्यटक गडाच्या पायथ्याहून माघारी गेले. त्यानंतर वनविभागाने नियोजन केल्याने घाट रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. रविवारी दिवसभरात सिंहगडावर दुचाकी व चारचाकी 1655 वाहने गेली तसेच खासगी प्रवासी वाहने व खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या वाहनांची संख्याही मोठी होती.

– समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड.

हेही वाचा

Back to top button