निबंध स्पर्धा : निबंधातून व्यक्त झाला व्यवस्थेविरोधातील रोष! | पुढारी

निबंध स्पर्धा : निबंधातून व्यक्त झाला व्यवस्थेविरोधातील रोष!

पुणे, वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर समाजात विविध माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अनेकांनी तीव्र संतापही व्यक्त केला. याबाबत पुणे शहर युवक काँग्रेसनेही घेतलेल्या निबंध स्पर्धेतही 325 जणांनी निबंध लिहिला आणि त्यातून शासकीय यंत्रणा, पोलिस, न्यायालयावर दबाव टाकणारी व्यवस्था यांच्याबाबत रोष व्यक्त करण्यात आला.

बाल गुन्हेगाराला बाल न्याय मंडळाने 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा केली होती. या अपघातामुळे पबविरोधात आंदोलन सुरू झाले होते. अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांना न्याय मिळावा. तसेच, दोषींना शिक्षा व्हावी या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने निबंध आंदोलनाचे आयोजन केले होते. कल्याणीनगर येथे अपघातात बळी गेलेल्या अश्विनी, अवनीश यांना श्रद्धांजली वाहून स्पर्धेची सुरुवात झाली. सदर स्पर्धेमध्ये पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. निबंध लिखाण करणार्‍या स्पर्धकांनी आपल्या मनातील रोष हा त्या निबंधामध्ये व्यक्त केला. ‘माझा बाप बिल्डर असता तर’, ‘दारूचे दुष्परिणाम’, ‘माझी आवडती कार (पोर्शे, फरारी)’, ‘तरुण पिढी आणि व्यसनाधीनता’, ‘रस्ते अपघात टाळण्यासाठी काय करावे’ या विषयांवर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली होती.

या वेळी आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाठ, माजी नगरसेवक सुनील मलके, संगीता तिवारी, रमेश सकट, ज्योती चंदेलवाल, विल्सन चंदेवल, अमित म्हस्के, अनिल आहिर, डॅनियल मगर, शिवानी माने, सारिका मुंडावरे, ऋणेश कांबळे, विकार शेख, डॉ. विक्रम गायकवाड, अभिजित साळवे, सचिन खळदकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल शिरसाट यांनी केले होते.

हेही वाचा

Back to top button