विद्येच्या प्रांगणात धुँआ! विद्यापीठ प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष | पुढारी

विद्येच्या प्रांगणात धुँआ! विद्यापीठ प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष

पुणे : कल्याणीनगरमध्ये झालेल्या मोटार अपघातानंतर तरुणांमधील व्यसनांचा गंभीर मुद्दा समोर आला असतानाच, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात अमली पदार्थ सापडल्याचा प्रकार उघडकीस आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याप्रकरणी विद्यापीठ प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. युवासेनेचे शहरप्रमुख राम थरकुडे यांनी या संदर्भातील पत्र विद्यापीठाला दिले आहे.

’काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहात अमली पदार्थ आढळून आले होते. विद्यापीठाच्या आवारात अमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर आहे. याबाबत विद्यापीठाकडून तातडीने पावले उचलणे अपेक्षित असताना विद्यापीठाकडून काहीच करण्यात आले नाही. विद्यापीठात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तसेच विद्यार्थी चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत, याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्यांचे वय, शिक्षण लक्षात घेता त्यांचे समुपदेशन करावे. तसेच विद्यापीठाने जागरूकता मोहीम राबवावी. या संदर्भात पोलिसांना माहिती कळवून अमली पदार्थ पुरवणार्‍या विकृतींवर कारवाई करण्यास विद्यापीठ प्रशासनाने मदत करावी.

यापुढे विद्यापीठ आवारात, तसेच महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थ येणार नाहीत, यासाठी दक्ष राहून नशामुक्ती अभियान राबवावे,’ अशी मागणी युवासेनेने पत्राद्वारे केली आहे. अमली पदार्थ सापडल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाची भूमिका आणि निष्क्रियता संशयास्पद आहे. पुढील दोन दिवसांत याबाबत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा थरकुडे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे. दरम्यान विद्यापीठातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासंदर्भात माहिती दिली असून एक मुलगा ई-सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थाचे व्यसन करताना आढळला. त्यानंतर त्याला वसतिगृहातून काढून टाकण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत खुलासा विद्यापीठ प्रशासन सोमवारी करणार आहे.

हेही वाचा

Back to top button