पराभवाने कुणीही खचून जायचे नाही; अजित पवार असे का म्हणाले? | पुढारी

पराभवाने कुणीही खचून जायचे नाही; अजित पवार असे का म्हणाले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली बारामती लोकसभा निवडणूक चुरशीची झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये झालेल्या अतितटीच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीतील पराभवाने कुणीही खचून जायचे नाही, असे म्हटले आहे. ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज (दि.२७) बोलत होते.

पराभवाने कुणीही खचून जायचे नाही; अजित पवार असे का म्हणाले?

  • बारामती लोकसभा निवडणूक चुरशीची झाली.
  • सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अतितटीची लढत
  • निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष
  • लोकसभा निवडणुकीत नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांनी चांगले काम केले.

लोकसभा निवडणुकीत नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांनी चांगले काम केले आहे. त्याबद्दल तुमचे आभार मानतो, असेही पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत आपल्याकडे केवळ ७ जागा होत्या. त्यामुळे या निवडणुकीत जादा जागा मागता आल्या नाहीत. प्रत्येकाने आपला मानसन्मान ठेवला पाहिजे. लोकभेची साताऱ्याची जागा भाजपकडून उदयनराजे यांनी लढवली असली तरी, राज्यसभेची जागा साताऱ्यालाच मिळणार आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो, त्यामुळे त्यांना जपले पाहिजे. स्वाभिमानीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची स्थापना झाली आहे. परंतु, त्यानंतर आपण पाच सहा महिन्यातच काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती. हा आता इतिहास झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा १० जूनला वर्धापन दिन साजरा करा, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात अनेक ठिकाणी वळीव पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे सुरू केले आहेत. लवकरच आढावा बैठक घेतली जाणार आहे. राज्याच्या काही भागात तीव्र पाणी टंचाई आहे. त्या-त्या ठिकाणी टँकर सुरू केले आहेत. मान्सून पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा बैठक घेण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे आचार संहिता शिथिल करण्याबाबत निवडणूक आयोगाला कळवले आहे. परंतु शेवटी आयोगाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा 

Back to top button