Cyclone Remal | बंगालच्या उपसागरात ‘रेमल’ चक्रीवादळाची निर्मिती, IMD ची माहिती | पुढारी

Cyclone Remal | बंगालच्या उपसागरात 'रेमल' चक्रीवादळाची निर्मिती, IMD ची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. दरम्यान, हे कमी दाब क्षेत्र पुढील काही तासांत अधिक तीव्र होणार असून, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची अधिक शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. यंदाच्या हंगामातील हे पहिलेच चक्रिवादळ असून या वादळाला ‘रेमल’ (Cyclone Remal) असे नाव देण्यात आले असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

‘रेमल’ चक्रीवादळाची अशी होणार निर्मिती

शुक्रवारी (दि.२४) मध्य मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र ईशान्येकडे सरकणार असून शनिवारी २५ मे च्या सकाळपर्यंत कमी दाबाचे रूपांतर चक्रीवादळात होईल. तसेच पुढे हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून शनिवारी २५ मे च्या संध्याकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यानंतर ते २६ मे रोजी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ अधिक तीव्र होण्याची अधिक शक्यता आहे.

‘या’ किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा

भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात विकसित होणारे चक्रीवादळ रविवारी म्हणजेच २६ मे रोजी जवळजवळ उत्तरेकडे सरकत राहून, ते बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगाल किनारपट्टीजवळ अधिक तीव्र होईल. त्यानंतर २६ मेच्या मध्यरात्री हे तीव्र चक्रिवादश सागर बेट आणि खेपुपारा दरम्यान, अतिशय तीव्र चक्रीवादळ म्हणून ओलांडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, या संदर्भातील माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

‘या’ भागावर प्रभाव, अतिमुसळधारेची शक्यता

IMD बुलेटिन नुसार, चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीचे जिल्हे प्रभावित होतील. रविवार २६ मे आणि सोमवार २७ मे रोजी ‘या’ राज्यातील भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे, बहुतेक भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

याच काळात ६ वर्षांपूर्वी ‘मेकुना’ चक्रीवादळ

६ वर्षांपूर्वी म्हणजे २४ मे २०२८ रोजी अशाच प्रकारचे फार तीव्र चक्रीवादळ अरबी समुद्रावर निर्माण झाले होते. या चक्रीवादळाला ‘मेकुना’ असे नाव देण्यात आल्याची माहिती पुणे हवामानशास्त्र विभागाचे डॉ. के. एस. होसाळीकर यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

Back to top button