Pune Porsche Car Accident | पोर्शे कार अपघात : अल्पवयीन मुलाला दारू देणाऱ्या बारमालकाला अटक | पुढारी

Pune Porsche Car Accident | पोर्शे कार अपघात : अल्पवयीन मुलाला दारू देणाऱ्या बारमालकाला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : कल्याणीनगर परिसरात पोर्शे कार अपघाताच्या (Pune Porsche Car Accident) घटनेनंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. या अपघातातील आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून अग्रवाल फरार होते. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अपघाताच्या रात्री अल्पवयीन मुलाला दारू पिण्यास देणारा बार मालक आणि बार मॅनेजरलादेखील पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

पुणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाची पोर्शे कार चालविणार्‍या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात दुचाकीला धडक दिल्याने आयटी इंजिनिअर असलेल्या तरुण-तरुणीचा शनिवारी (दि. १८) मृत्यू झाला होता. त्यानंतर येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारचालक अल्पवयीन युवकाला बाल न्याय मंडळाने रविवारी जामीन मंजूर केला.

आयटी अभियंता तरुण- तरुणीच्या अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिसांनी कुठलीही नरमाईची भूमिका घेतलेली नाही. आरोपी अल्पवयीन असल्याने यापेक्षा वेगळी कायदेशीर भूमिका घेण्यास काही मर्यादा आल्या. जर कोणी यापेक्षा वेगळी भूमिका घेऊ शकतो आणि पुणे पोलिसांनी घेतली नाही, असे दाखवून दिले, तर जनतेची जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सोमवारी (दि.२०) पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले होते.

बारमालकावर गुन्हा

अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी कशी दिली म्हणून त्याच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते. याचबरोबर त्याला बार आणि पबमध्ये प्रवेश देणार्‍या हॉटेल कोझीचे मालक नमन भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, असेही त्यांनी सांगितले.

कारवाईचे आदेश

पब आणि बारला ठरवून देण्यात आलेल्या वेळेची मर्यादा पाळण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. पबच्या बाहेर कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. त्यासाठी पोलिस अधिकार्‍यांसोबत बैठक झाली आहे. वाहतूक नियमांचा भंग तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍यांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांशी याबाबत आम्ही चर्चा केली असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

हे ही वाचा :

 

Back to top button