Loksabha election | पुणेकरांच्या मताचा वाढीव टक्का, कुणाच्या पारड्यात जाणार?

Loksabha election | पुणेकरांच्या मताचा वाढीव टक्का, कुणाच्या पारड्यात जाणार?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात चुरशीच्या झालेल्या पुणे लोकसभा निवडणुकीत 51.25 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 57.90 टक्के इतके मतदान झाले, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड मतदारसंघात सर्वाधिक कमी म्हणजेच 49.10 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, 2019 च्या तुलनेत पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला आहे. हा वाढीव टक्का नक्की कुणाला धक्का देणार, याबाबत उत्सुकता लागली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत कसबा पेठ, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा पेठ हा मतदारसंघ गतवर्षी पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांनी खेचून आणला. 2 लाख 77 हजार मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात सर्वाधिक 57.90 इतके मतदान झाले. सकाळी 9 वाजता 6.93 टक्के, 11 वाजता 18.1 टक्के, 1 वाजता 31.1 टक्के, 3 वाजता 35.23 टक्के आणि 5 वाजता 51.07 अशा पध्दतीने मतदान झाले. धंगेकर येथील स्थानिक आमदार असल्याने येथून जास्तीत जास्त मताधिक्य घेण्याचे त्यांचे नियोजन होते.

तर, भाजपला मानणारा मोठा वर्ग इथे असल्याने मोहोळ यांनाही येथे मताधिक्य मिळाले, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुऴे भाजप आणि ?ाँग्रेस या दोन्ही पक्षांना या मतदारसंघातून मताधिक्याची मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे हा वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात अधिक मते टाकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपचे उमेदवार मोहोळ यांचा कोथरूड हा घरचा मतदारसंघ आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात दुसर्‍या क्रमाकांची म्हणजेच तब्बल 4 लाख 14 हजार मते असलेल्या या कोथरूडमध्ये 49.10 टक्के इतके मतदान झाले. मोहोळ यांनी कोथरूडमधून जास्तीत जास्त मताधिक्य घेण्याचे टार्गेट ठेवले होते.

कोथरूडमधील अनेक मतदान केंद्रांपासूनच मतदारांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. युवावर्गापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटकांतील मतदार उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले होते. सकाळी 9 वाजेपर्यंत 7.59 टक्के, 11 वाजेपर्यंत 18.2 दुपारी 1 वाजेपर्यंत 29.1, दुपारी 3 वाजेपर्यंत 37. 2 आणि सायंकाळी 5 वाजता 48.91 टक्के इतके मतदान झाले. त्यानंतर मात्र फारसे मतदान झाले नाही. त्यामुळे 2019 च्या लोकसभेच्या तुलनेत जवळपास 1 टक्का मतदान कमी झाले. म्हणजेच येथील मतांचा टक्का घसरल्याने भाजपची धास्ती काहीसी वाढणार आहे. तर, दुसरीकडे कोथरूड महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मते खेचण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांनाही सुरुंग लागण्याची शक्यता आहे. पर्वती मतदारसंघात सायंकाळी सहापर्यंत 52. 43 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.

3 लाख 41 हजार मतदार इतके मतदान या ठिकाणी आहे. या मतदारसंघाने भाजपला नेहमीच साथ दिली आहे. त्यामुऴे येथे जास्तीत जास्त मताधिक्य घेण्याचे भाजपचे टार्गेट होते. या मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.99 टक्के, 11 वाजेपर्यंत 17.84, दुपारी 1 वाजेपर्यंत 27.14, दु. 3 वाजेपर्यंत 38.1 आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत 46.80 टक्के इतके मतदान झाले. या मतदारसंघातील सोसायट्या आणि वस्ती भाग दोन्हींमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यामुळे भाजप, काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांनाही या मतदारसंघात चांगल्या मतांची अपेक्षा आहे. गत निवडणुकीप्रमाणे या मतदारसंघातील मतांची टक्केवारी जैसे थे असल्याचे दिसून आले.

सलग दोन टर्ममध्ये भाजपचे आमदार निवडून आलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसला मोठ्या मताधिक्याची अपेक्षा आहे. जवळपास 2 लाख 82 हजार मतदान असलेल्या या मतदारसंघात 50. 52 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 5.69 टक्के, 11 वाजेपर्यंत 13.89, दुपारी 1 वाजेपर्यंत 23.21, दुपारी 3 वाजेपर्यंत 31.5 आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत 44.01 टक्के इतके मतदान झाले. या मतदारसंघात काँग्रेससह भाजप, वंचित आणि एमआयएम या चार पक्षांना मताधिक्याची अपेक्षा आहे. वाढलेल्या मतांच्या टक्केवारीने सर्वच प्रमुखांच्या अपेक्षाही वाढणार आहेत. आता कोणाला किती मते मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सर्वाधिक 4 लाख 67 हजार इतकी मतदारसंख्या असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघात 49.71 टक्के इतके मतदान झाले. सकाळी 9 वाजेपर्यंत 5.9 टक्के, 11 वाजेपर्यंत 14.67, दुपारी 1 वाजेपर्यंत 24.85, दु. 3 वाजेपर्यंत 29.27 आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत 40.50 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघाच्या मतदानात 3 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. या मतदारसंघात उच्चभ्रू सोसायटी, वस्ती विभाग आणि झोपडपट्टी असे संमिश्र मतदार आहेत. त्यात सोसायटी वर्ग भाजपला मानणारा, तर झोपडपट्टी वर्ग काँग्रेस आणि वंचितचा हक्काचा मतदार राहिला आहे.

या ठिकाणी या चारही उमेदवारांना मोठी अपेक्षा असली, तरी भाजप आणि काँग्रेस यांच्यातच खरी रस्सीखेच असणार आहे.शिवाजीनगर मतदारसंघात 49.72 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. 2 लाख 78 हजार मतदार असलेल्या याही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 6.46 टक्के, 11 वाजेपर्यंत 13.94, दुपारी 1 वाजेपर्यंत 23.26, दुपारी 3 वाजेपर्यंत 37.2 आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत 44.1 टक्के इतके मतदान झाले. या मतदारसंघात प्रामुख्याने दिवसभर झोपडपट्टी आणि वस्ती भागातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या, तर सेनापती बापट रस्ता, मॉर्डन कॉलनी, प्रभात रस्ता या उच्चभ्रू वस्ती असलेल्या मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी होती. या मतदारसंघातील घसरलेला टक्का नक्की कोणासाठी डोकेदुखी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news