लंडन : केवळ माणसालाच बुद्धी आहे असे काही नाही. निसर्गाने सर्वच जीवांना संरक्षण, उदरभरण करण्याइतकी बुद्धी दिलेली आहे. काही प्राणी तर शिकार्यांपासून बचाव करण्यासाठी मरण्याचे नाटकही करतात. त्यांचा त्यावेळेचा अभिनय पाहून भले भले अभिनेतेही थक्क होतील! शिकार्यांना मूर्ख बनवण्यासाठी काही कीटक, मासे, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राण्यांमध्ये अशी वृत्ती दिसून येते. मृत्यूच्या या नाटकाला 'थानाटोसिस' असे म्हटले जाते. डाइस सापातही अशी वृत्ती असते. हा साप तर रक्त बाहेर काढून मरण्याचे नाटक करतो!
बायोलॉजी लेटर्स जर्नलमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये या डाइस सापाची अफलातून क्षमता सांगितली आहे. या सापाला 'नॅट्रिक्स टेसेलाटा' असे वैज्ञानिक नाव आहे. तो आपले मरण्याचे नाटक अतिशय वेगळ्या स्तरावर नेतो. ज्यावेळी या सापाचा शिकार्याशी सामना होतो, त्यावेळी तो मल आणि पचनसंस्थेतील सडलेले भोजन बाहेर काढतो. त्यानंतर तो पाठीवर पहुडतो आणि मरण्याचे नाटक करतो. तो अनेक दिवसांपासून तिथे मृत पडलेला आहे असे तो यामधून दर्शवतो. इतकेच नव्हे तर आपल्या तोंडातून रक्तही बाहेर काढतो, जेणेकरून शिकार्यांना तो पसंत पडणार नाही.
बेलग्रेड युनिव्हर्सिटीचे जैववैज्ञानिक वुकासिन बजेलिका यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, मृत्यूचे नाटक करणे हे अतिशय जोखमीचे काम असते. मात्र त्याच्यामुळे मोठा फायदाही होऊ शकतो. शिकारी दुर्लक्ष करून निघून जाण्याची शक्यता यामध्ये असते. मात्र जर शिकार्याने त्याला तशाही स्थितीत खाण्याचा प्रयत्न केला तर पळून जाणेही कठीण होईल! त्यामुळेच हा साप तोंडातून रक्त बाहेर काढतो. डाईस सापाची लांबी चार फुटांपर्यंत असते व ते बिनविषारी साप आहेत. त्यामुळेच शिकार्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते अशी शक्कल लढवतात!