लंडन : इंग्लंडच्या पुरातत्त्व संशोधकांना उत्खननात रोमनकालीन एक रहस्यमय पदार्थ मिळाला आहे. संशोधकांनी दावा केला आहे की, त्याची किंमत त्या काळी सोन्यापेक्षाही अधिक राहिलेली असावी. इंग्लंडच्या कार्लिस्लेमधील कॅथेड्रल शहरात केलेल्या उत्खननामध्ये हा नरम, जांभळ्या रंगाचा पदार्थ सापडला. हा पदार्थ एका रोमन स्नानगृहातील उत्खननावेळी मिळाला. ही तिसर्या शतकातील इमारत होती.
पुरातत्त्व संशोधकांनी सांगितले की, या सामग्रीचे परीक्षण करण्यासाठी ब्रिटिश जिओलॉजिकल सोसायटीच्या सहकार्याने काम करण्यात आले. न्यूकॅसल विद्यापीठाच्या संशोधकांना आढळले की, हा एक कार्बनिक पदार्थ आहे. त्यामध्ये ब्रोमीन आणि मेणाचा स्तर असतो. या पदार्थाची ओळख 'टायरियन पर्पल'च्या रूपात झाली आहे.
हा एक खास रंग होता, जो रोमन साम्राज्याच्या शाही दरबाराशी जोडत होता. उत्तर आफ्रिका आणि मोरोक्कोच्या हजारो चिरडलेल्या शिंपल्यांपासून तो बनवला जात असे. हा पदार्थ बनवणे त्या काळात अतिशय कठीण काम होते. त्याच्या उत्पादनालाही मोठा खर्च येत असे. त्यामुळे त्याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक होती. या शोधावरून असेही दिसते की, त्या काळात रोमन सम्राट सेप्टिमियस सेवेरस याने कार्लिस्लेचा दौरा केला होता.