ओमायक्रॉन : परदेशातून पुण्यात आलेल्या सहाशे जणांवर वॉच; शोध सुरू, चाचण्यांवर भर | पुढारी

ओमायक्रॉन : परदेशातून पुण्यात आलेल्या सहाशे जणांवर वॉच; शोध सुरू, चाचण्यांवर भर

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

ओमायक्रॉन च्या धास्तीने पुणे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाकडून परदेशातून आलेल्यांचा शोध सुरू केला आहे. शहरासह जिल्ह्यात 598 प्रवासी हे दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून परतले आहेत. त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना शोधण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. महापालिकेने सतरा जणांना शोधून त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. ओमायक्रॉन चा फैलाव टाळण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्‍न करत आहे.

परदेशातून आलेल्यांचा शोध घेऊन ते जर बाधित असतील तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध लगेचच घेण्यात येत आहे. आज (शुक्रवार) सकाळच्या अपडेटनुसार पुणे शहरामध्ये 393, पिंपरी-चिंचवडमध्ये 131, ग्रामीण भागात 67 खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 6 आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये एक अशा एकूण 598 व्यक्ती परदेशातून आल्‍या असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. ग्रामीण भागातील तेरा तालुक्यांपैकी हवेलीत सर्वाधिक 29 व्यक्तींचा समावेश आहे. मुळशीमध्ये 11, बारामती, इंदापूर, जुन्नरमध्ये प्रत्येकी तीन व्यक्तींचा समावेश आहे.

परदेशातून येणार्‍या नागरिकांची चाचणी व त्यांना गृहविलगीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार राज्यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिले असून, पुण्यात आलेल्या सुमारे साडेतीनशे नागरिकांची आता आरटीपीसीआर चाचणी होणार आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा देखील शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

राज्याच्या आरोग्य विभागाने व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे राज्यातील सर्वच आरोग्य प्रमुखांशी संवाद साधून कोरोना संदर्भातील आढावा घेतला. तसेच परदेशातून आलेला प्रवाशांची तपासणी आणि विलगीकरणाबाबत सूचना देतानाच संभाव्य धोका टाळण्यासाठी 1 नोव्हेंबरनंतर परदेशातून येथे परतलेल्या नागरिकांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका पथके स्थापन करून लवकरच ही तपासणी मोहीम राबवणार असल्याचे डॉ. भारती यांनी सांगितले.

या सर्वांची होणार कोरोना चाचणी…

शहरात एक नोव्हेंबरपासून परदेशातून पुण्यात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी होणार आहे. आता ज्या – ज्या शहरात परदेशातून नागरिक येत आहेत, त्यांची कोरोना चाचणी करणे देखील बंधनकारकच करण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गापेक्षा सुमारे सातपट वेगाने ओमायक्रॉनचा संसर्ग आहे. ओमायक्रॉन हा महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या कर्नाटकात ओमायक्रॉन’ची लागण झालेले दोन नागरिक सापडले आहेत. त्यामुळे या विषयातील गांभीर्य अधिक वाढले आहे.

दक्षिण आफ्रिकेसह परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांची यादी महापालिकेकडे उपलब्ध आहे. आम्ही त्यांच्याशी व त्यांच्या संपर्कात आलेल्यांशी संपर्क सुरू केला आहे. त्यांची आरटीपीसीआर करून घेण्यात येणार आहे. बुधवारीही 17 जणांची चाचणी करून घेतली होती व ती निगेटिव्ह आली आहे.
– डॉ. संजीव वावरे, साथरोग विभाग प्रमुख, पुणे महापालिका

Back to top button