महाबीजच्या यशात शेतकरी, भागधारक, वितरक आधारस्तंभ : पी. बी. देशमुख | पुढारी

महाबीजच्या यशात शेतकरी, भागधारक, वितरक आधारस्तंभ : पी. बी. देशमुख

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) यशस्वी वाटचालीमध्ये बीजोत्पादक शेतकरी, भागधारक, वितरक हे भक्कम आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सक्रिय योगदानामुळेच शेतकर्‍यांना मुबलक व दर्जेदार बियाण्यांचा रास्त दरात पुरवठा होत असल्याचे गौरवोद्गार महाबीजचे पुणे विभागीय व्यवस्थापक पी. बी. देशमुख यांनी काढले. मार्केट यार्डातील पुणे विभागीय कार्यालयात रविवारी (दि. 28) महाबीजचा 48 वा वर्धापन दिन महिला कर्मचार्‍यांच्या हस्ते केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

या वेळी जिल्हा व्यवस्थापक बी. बी. पिंगळे, गहू बीजोत्पादक शेतकरी बाळासाहेब राक्षे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास शेतकरी, बियाणे वितरक, कामगार उपस्थित होते. महाबीजच्या वाटचालीत शेतकर्‍यांनी दिलेली साथ मोलाची आहे. महाबीजची बायोफर्टिलायझर खते ही दर्जेदार असून रास्त दरात शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली जात आहेत. ऊती संवर्धित केळीच्या रोपांनाही चांगली मागणी आहे. जमिनीतील सुपिकता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. त्यावर शेणखताला पर्यायी म्हणून महाबीजची धैंचा आणि बोरू ही हिरवळीची खते शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय होत असल्याचे देशमुख म्हणाले. पुरुषोत्तम फाटे यांनी सूत्रसंचालन केले.

  • विभागीय व्यवस्थापक पी. बी. देशमुख यांचे गौरवोद्गार
  • शेतकर्‍यांसमवेत 48 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • दर्जेदार, रास्त दरात सेवा उपलब्ध

आमचे कुटुंब गेली काही वर्षे महाबीजच्या गव्हाचे बीजोत्पादन घेते. ऊसपीक काढल्यानंतर शेतकरी कांदा किंवा गव्हाचे पीक घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, आम्ही वर्षानुवर्षे महाबीजच्या गव्हाच्या बियाण्यांचे बीजोत्पादन घेत आलो आहोत. शेतकर्‍यांसाठी बीजोत्पादन फायदेशीर आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी महाबीजने बीजोत्पादनाच्या प्रसिद्धीवर भर द्यावा.

– बाळासाहेब राक्षे, महाबीज बीजोत्पादक, रांजणगाव सांडस, शिरूर-पुणे.

हेही वाचा

Back to top button