कोल्हापूर : शहरात अनेक ठिकाणी नाल्यांचे झाले गटार | पुढारी

कोल्हापूर : शहरात अनेक ठिकाणी नाल्यांचे झाले गटार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर  शहरात अनेक ठिकाणी नाले तुंबलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात महत्त्वाचे चौक, उपनगरे अशा ठिकाणी पाणी तुंबते. काही ठिकाणी घरांतही पाणी शिरते; पण महापालिका कागदोपत्री नालेसफाई झाल्याचा दिखावा करते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाले अजून तुंबलेलेच आहेत. काही ठिकाणी नैसर्गिक रुंदी कमी करून नाले अरुंद केले आहेत. त्याबाबत आढावा घेणारी मालिका आजपासून…

जयंती आणि दुधाळी या दोन महत्त्वाच्या नाल्यांना येऊन मिळणारे शहरातील अनेक उपनाले अजूनही तुंबलेलेच आहेत. हे तुंबलेले नाले महापालिकेच्या नालेसफाईच्या यादीत केव्हाच येत नाहीत. शहरातील महत्त्वाची काही ठिकाणे आणि उपनगरे येथे पावसाळ्यात जे काही तळ्याचे किंवा डबक्याचे स्वरूप येते, त्याला हे उपनाले साफ न करणे हेच एक महत्त्वाचे कारण आहे. इतकेच नाही, तर काही ठिकाणी या नाल्यांची रुंदी कमी केली. बांधकामाच्या सोयीनुसार काही नाले व्यावसायिकांनी हवे तसे वळविले, बुजविले. त्यांची रुंदी कमी केली. त्याचा फटका पावसाळ्यात शहरवासीयांना बसतो आणि ठिकठिकाणी शहर तुंबते.

राजारामपुरीत नाल्याची खोली, रुंदी झाली कमी

राजाराम कॉलेज, शिवाजी विद्यापीठाच्या समोरच्या बाजूचे पावसाळी पाणी वाहून आणणारा आणखी एक महत्त्वाचा नाला बागल चौकात येऊन जयंती नाल्याला मिळतो; परंतु राजारामपुरी बस रूट ते जनता बाझार चौकापर्यंत हा नाला पूर्णपणे अंडरग्राऊंड झाला. व्यावसायिकीकरणासाठी नाला झाकलेला आहे. तो साफदेखील करता येत नाही. त्याचबरोबर जनता बाझार चौक ते शाहू मिल चौकीच्या दिशेपर्यंत या नाल्याची खोली कमी झाली आहे. या नाल्यावर स्लॅब टाकून फेरीवाला मार्केट उभा केले आहे; परंतु नाल्याचे दगडी बांधकाम ढासळत आहे. हा नाला नीट साफ करता येत नसल्याने राजारामपुरी चौकाला नेहमीच तळ्याचे स्वरूप येते.

Back to top button