पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांतील लढतींचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतेक मतदारसंघांत दुरंगी व तिरंगी लढती होत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, बारामतीत खरी लढाई सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यात होणार असली तरी त्या मतदारसंघात मात्र उमेदवारांची भाऊगर्दी आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पात्र 46 उमेदवारांपैकी आठजणांनी माघार घेतल्याने तेथे आता 38 उमेदवार रिंगणात आहेत. तिसर्या टप्प्यात महाराष्ट्रात कोल्हापूर, हातकणंगले, बारामती, सातारा, सांगली, रायगड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या 11 मतदारसंघांत येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
उमेदवारांची संख्या 16 पेक्षा जास्त राहिल्याने आता बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमची संख्या वाढणार आहे. 15 उमेदवार व एक नोटा असल्यास एक मतदान यंत्र लागते. मात्र, आता 38 उमेदवारांसाठी पहिल्या दोन यंत्रांमध्ये प्रत्येकी 16 उमेदवार, तर तिसर्या यंत्रात उर्वरित 6 उमेदवार व एक नोटा असे सात बटण असणार आहेत. जिल्हा निवडणूक यंत्रणेने यापूर्वी 1 मतदान यंत्र लागेल असे गृहित धरून मतदान साहित्याचे वाटप केले आहे. आता त्यात आणखी दोन मतदान यंत्र वाढणार आहेत. त्यामुळे साराच ताण वाढला आहे. दरम्यान, बारामतीमध्ये अपक्ष म्हणून अर्ज भरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके, सचिन खरात, शेखर कदम, संतोष वालगुडे, अब्दुलरोफ जाफर मुलाणी, विक्रम कोकरे, विजयालक्ष्मी सिंदगी, भाऊ मरगळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
हही वाचा