खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी मध्यरात्री एक केमिकल वाहून नेणारा टँकर खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे शिवरे (ता. भोर) हद्दीत उलटल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच शिंदेवाडी ते शिवरे (ता.भोर) असा सुमारे नऊ ते दहा किलोमीटरच्या दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टँकर अवजड असल्यामुळे तीन ते चार क्रेन लावूनही तो बाजूला घेण्यात अपयश येत होते. त्यामुळे वाहनांच्या रांगांमध्ये भर पडत असल्याचे दिसून आले.
पुणे कडून सातारा कडे केमिकल वाहून नेणारा टॅंकर उलटला मध्य रात्रीची वेळ असल्याने त्या ठिकाणी कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची यंत्रणा ही उशिरा पोहोचल्याने शिवरे ते शिंदेवाडी या दरम्यान सुमारे दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहन चालकांना तसेच पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. खेड शिवापुर टोलनाक्यावरून जरी वाहन मोफत सोडले तरी ते वाहन पुढे जाऊ शकत नव्हते. कारण शिवरे हद्दीत वाहतूक कोंडी असल्याने पुढच्या बाजूस खूप मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या त्यामुळे टोलनाक्यावरून कुठलेही वाहन पुढे जात नव्हते. या वाहतूक कोंडीपुढे महामार्ग पोलिसही हतबल झाले होते.
पुणे सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांनी आपला मोर्चा बाजूच्या सेवा रस्त्यांवर वळविला. परिसरातील राज्य जिल्हा मार्ग या रस्त्यावरून सुद्धा वाहतूक वळाल्याने परिसरातील सर्वच रस्ते वाहनांनी गजबजलेले दिसले. त्यामुळे ग्रामीण भागातील उप रस्त्यांवर सुद्धा वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आल्याने स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
याबाबत खेड शिवापूर टोलनाक्याचे व्यवस्थापक अमित भटिया यांनी सांगितले की, आम्ही मध्य रात्रीपासूनच टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न चालू केले आहे. केमिकल घेऊन जाणारा टँकर असल्याने तो चार क्रेन लावून सुद्धा बाजूला घेता येत नव्हता, त्यामुळे आम्ही अधिक सामुग्री मागवलेली आहे. त्यातच शिवरे येथे रस्त्याचे काम चालू असल्याने त्या ठिकाणी वेळ लागत आहे. थोड्याच वेळात वाहतूक सुरळीत केली जाईल.
हेही वाचा