हातकणंगलेत चौरंगी, कोल्हापुरात दुरंगी लढत

हातकणंगलेत चौरंगी, कोल्हापुरात दुरंगी लढत
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघात दुरंगी, तर हातकणंगलेत चौरंगी लढत होणार आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सोमवारी कोल्हापुरातून चारजणांनी, तर हातकणंगलेतून पाच अशा एकूण नऊजणांनी माघार घेतली. यामुळे कोल्हापुरातून 23 उमेदवार, तर हातकणंगलेतून 27 उमेदवार रिंगणात आहेत. 15 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने आता दोन्ही मतदारसंघांत दोन बॅलेट युनिट जोडावी लागणार आहेत.

कोल्हापूर मतदारसंघातून माजी आमदार मालोजीराजे, वीरेंद्र मंडलिक, रूपा वायदंडे आणि राहुल लाड यांनी अर्ज मागे घेतले. हातकणंगलेतून डमी म्हणून भरलेला धैर्यशील माने, वेदांतिका माने यांच्यासह बाबासो पाटील, शिवाजी माने, सुनील अपराध यांनी अर्ज मागे घेतले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 28 उमेदवारांनी एकूण 42 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत दोन उमेदवारांचे तीन अर्ज अवैध ठरले. एका उमेदवाराचा एकच अर्ज होता, तो अवैध ठरल्याने कोल्हापूर मतदारसंघातून 27 उमेदवार होते. त्यापैकी केवळ चारजणांनीच अर्ज मागे घेतले, त्यातही दोन अर्ज डमी होते.

हातकणंगले मतदारसंघासाठी 36 उमेदवारांची एकूण 55 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यामुळे हातकणंगले मतदारसंघातून 32 उमेदवार होते. यापैकी पाचजणांनी माघार घेतले. यामध्येही दोन अर्ज डमी म्हणून भरलेले होते. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले.

बाजीराव खाडे यांची बंडखोरी

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. ते माघार घेतील अशी शक्यता होती. मात्र, त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे काँग्रेसमध्येही बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

प्रथमच उमेदवार संख्या जास्त

लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 1991 मध्ये कोल्हापूरमधून सर्वाधिक 16 उमेदवार होते. यावेळी 23 उमेदवार रिंगणात आहेत. हातकणंगलेतून 2019 मध्ये सर्वाधिक 17 उमेदवार होते, यावेळी 27 उमेदवार रिंगणात आहेत.

कोल्हापूर मतदारसंघात 14, तर हातकणंगलेत 15 अपक्ष

कोल्हापूर मतदारसंघातून 14 तर हातकणंगलेतून 15 असे 29 अपक्ष उमेदवार नशीब आजमावणार आहेत. कोल्हापुरातून राष्ट्रीय पक्षाचे दोन, राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाचा एक तर नोंदणीकृत राज्यस्तरीय पक्षाचे सहा उमेदवार रिंगणात आहेत. हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रीय पक्षाचा एक, राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाचे दोन, तर नोंदणीकृत राज्यस्तरीय पक्षाचे नऊ उमेदवार रिंगणात आहेत.

उमेदवार असे :

कोल्हापूर मतदारसंघ, कंसात पक्ष आणि मिळालेले चिन्ह
शाहू महाराज (काँग्रेस – हात), संजय मागाडे, (बसपा – हत्ती), संजय मंडलिक (शिवसेना – धनुष्यबाण)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार
संदीप कोगले (देश जनहित पार्टी- बॅट), बसगोंडा पाटील (भारतीय जवान किसान पार्टी – भेटवस्तू), अरविंद माने (भारतीय राष्ट्रीय दल – कॅरम बोर्ड), शशीभूषण देसाई (अखिल भारत हिंदू महासभा-रोडरोलर), सुनील पाटील (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी – गॅस सिलिंडर), संतोष बिसुरे (अपनी प्रजाहित पार्टी- सीसीटीव्ही कॅमेरा)
अपक्ष उमेदवार
इरफान चांद (हिरवी मिरची), कुदरतुल्ला लतिफ (शिवणयंत्र), कृष्णा देसाई (नारळाची बाग), कृष्णाबाई चौगले (हिरा), बाजीराव खाडे (ऊस शेतकरी), नागनाथ बेनके (शिट्टी), माधुरी जाधव (प्रेशर कुकर), मुश्ताक मुल्ला (दुरदर्शन), मंगेश पाटील (ईस्त्री), अ‍ॅड. यश हेडगे-पाटील (कोट), राजेंद्र कोळी (किटली), सलीम बागवान (अंगठी), सुभाष देसाई (लिफाफा), संदीप संकपाळ (बॅटरी टॉर्च).
हातकणंगले मतदारसंघ
रवींद्र कांबळे (बसपा-हत्ती), धैर्यशील माने (शिवसेना-धन्युष्यबाण), सत्यजित पाटील- सरुडकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे- मशाल)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार
इम—ान खतीब (बहुजन मुक्ती पार्टी – खाट), डॉ. ईश्वर यमगर, (भारतीय लोकशक्ती पार्टी- टीलर), दिनकरराव चव्हाण-पाटील (सिंह), धनाजी गुरव-शिवारेकर (लोकराज्य जनता पार्टी – ऑटो रिक्षा), डी. सी. पाटील (वंचित बहुजन आघाडी-प्रेशर कुकर), रघुनाथ पाटील (भारतीय जवान किसान पार्टी- भेटवस्तू), राजू शेट्टी (स्वाभिमानी पक्ष – शिट्टी), शरद पाटील, (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी- गॅस सिलिंडर), संतोष खोत ( कामगार किसान पार्टी- नारळाची बाग)

अपक्ष उमेदवार

अस्लम मुल्ला (चिमणी), आनंदराव थोरात (किटली), आनंदराव सरनाईक (बॅटरी टॉर्च), जावेद मुजावर (फुगा), लक्ष्मण डवरी (अंगठी), लक्ष्मण तांदळे (हिरा), प्रा. परशुराम माने (सफरचंद), मनोहर सातपुते (स्पॅनर), महंमद दरवेशी (एअर कंडिशनर), अरविंद माने (कॅरम बोर्ड), देवेंद्र मोहिते (ट्रक), राजेंद्र माने (दूरदर्शन), रामचंद्र साळुंखे (कपाट), शिवाजी संकपाळ (बॅट), सत्यजित पाटील (आबा)(माईक).

48 हातकणंगले लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी

धैर्यशील संभाजीराव माने (अपक्ष), वेदांतिका धैर्यशील माने, (अपक्ष), बाबासो यशवंतराव पाटील (अपक्ष), शिवाजी विठ्ठल माने (अपक्ष), सुनील विलास अपराध, (अपक्ष) .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news