श्रीरंग बारणेंचा उमेदवारी अर्ज दाखल; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती

श्रीरंग बारणेंचा उमेदवारी अर्ज दाखल; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दोन टर्म खासदार असलेले शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी शक्तिप्रदर्शन करीत मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 22) उमेदवारीअर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मंत्री, आमदार तसेच, महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते. आकुर्डी येथील 'पीएमआरडीए' कार्यालयात मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खा. श्रीरंग बारणे यांनी उमेदवारीअर्ज सादर केला. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, महेश बालदी, अश्विनी जगताप, उमा खापरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आकुर्डी येथील खंडोबा माळ मंदिरात दर्शन घेऊन खा. श्रीरंग बारणे यांच्या मिरवणुकीस सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरुवात झाली.
ढोल- ताशांचा दणदणाट, भगव्या टोप्या, फेटे, भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह, महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन सहाही विधानसभा मतदारसंघातून आलेले कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. भगवे टी- शर्ट व टोप्या घातलेले तरुण लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीत महिलांची संख्या मोठी होती. चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
रथामध्ये बारणे यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार, आमदार, पदाधिकारी उभे राहून नागरिकांना अभिवादन करीत होते. काही ठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

मागील मताधिक्यापेक्षा अधिक मतांनी विजयी होणार :

मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीचे आमदार आहेत. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील नागरिकांची भावना आहे. त्यामुळे या निवडणुकीत मागील मताधिक्यापेक्षा अधिक मतांनी विजयी होऊ, असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री काही न बोलता निघून गेले :

'पीएमआरडीए' कार्यालय परिसरातील दोन्ही बाजूच्या रस्त्यावर 100 मीटरवर पोलिसांनी सुरक्षा कठडे लावले होते. सुरुवातीला मोजक्याच लोकांना आत सोडण्यात आले; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, उमेदवारअर्ज भरण्यास आतमध्ये जाताच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा प्रवेशद्वाराबाहेर आला. मुख्यमंत्री शिंदे येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोटारीची काच खाली करत मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

कार्यालयाजवळच कार्यकर्त्यांची गर्दी; घोषणाबाजी :

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या 100 मीटरच्या आत कार्यकर्त्यांना परवानगी नसताना त्यांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी परिसरातील सर्व दुकानेही बंद ठेवली. कार्यकर्त्यांनीच कार्यालय परिसरात मोठी गर्दी केल्याने पोलिसांच्या नियोजनाचा फज्जा उडाला. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी 100 मीटरच्या आत येऊ नये, यासाठी पोलिसांनी योग्य ती घबरदारी घेणे गरजेचे होते. ती माझी जबाबदारी नाही. अर्ज भरण्यास पाच व्यक्ती माझ्या कक्षात आले होते; मात्र जे काही नियमांचे उल्लंघन झाले आहे, याबाबत पोलिसांना सूचना देण्यात येतील.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news